चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतरावांना ‘शॉक’ देणार्‍यास सोन्याचा मुकुट | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतरावांना ‘शॉक’ देणार्‍यास सोन्याचा मुकुट

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील राजकारणात एका नेत्याला असे वाटत होते की इथे फक्त आम्हीच काहीही करू शकतो; पण महापालिकेतील सभापती निवडणुकीत तुम्ही त्या नेत्याला ‘शॉक’ दिलात. अजून एक ‘शॉक’ देण्यात यशस्वी झालात तर, त्या नेत्याला मी खर्‍या सोन्याचा मुकुट देणार आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली.

आ. पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. महापालिकेतील सभापती निवडणुकीतील विजयाचा आंनद साजरा करण्यासाठी चंद्रकांत पाटील ‘विजयादशमी’चा मुहूर्त साधून येथे आलेे होते. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा आनंदोत्सव, भाजप पदाधिकार्‍यांची बैठक झाली.

आ. गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, शेखर इनामदार, सुरेश आवटी, महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने तसेच नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात एका पक्षाला नेहमीच असे वाटत आले की, आम्ही काहीही करू शकतो. त्यांना ते काही काळ जमलेही. पण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण बदलून टाकले. सांगलीतील राजकारणातही काहींना असेच वाटत होते की इथे फक्त आपणच काहीही करू शकतो. आपल्यातही काहींना तसे वाटते. ‘उसको उठाव इधर ले आवो, उसको उठाव उधर ले जावो’, असे ते करत होते आणि ते फक्त आपल्यालाच जमते असे त्यांना वाटत होते. मात्र, महापालिकेतील विजयाने त्यांना शॉक बसला आहे. चुणूक दाखविली आहे.

ते म्हणाले, हा सोन्याचा मुकूट निवडणुकीतील विजय म्हणून नव्हे; तर एक मेसेज म्हणून द्यायचा आहे. महापालिकेतील सभापती निवडणुकीतील विजयाने जिल्ह्यातील विरोधी नेतृत्वाला इशारा दिला आहे. ‘निवडणूक हे तुमचे काम नाही. त्यासाठी पैसे लागतात’, हा रूढ झालेला मेसेज एकदिलाने काम केले तर बदलू शकतो.

शरद पवार यांचा एकेरी उल्लेख

‘महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला (भाजपला) शरद पवार यांचे आव्हान नाही. त्यांना कधी 54 च्या वर जागा मिळालेल्या नाहीत. ते 60 पेक्षा अधिक जागा मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसाठी आव्हान ठरू शकत नाही’, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी यावेळी पवार यांचा एकेरी उल्लेख केला.

Back to top button