सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्तीची घोषणा करून एकच धक्का दिला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना ही घोषणा झाल्याने महाराष्ट्रात एकच हलकल्लोळ माजला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह काँग्रेस, भाजप, शिवसेना आदींसाठी ही घोषणा धक्कादायक होती. या घोषणेमागे कोणते राजकारण दडलेले आहे, ते येणार्या काही दिवसात उजेडात येईलच. या घोषणेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या निवृत्तीच्या आठवणींना उजाळा मिळाला. (Sharad Pawar resigns)
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटाची भाजपशी जवळीक वाढलेली आहे, हे सर्वश्रूत आहे. तशा बातम्याही वारंवार प्रसिद्ध होत होत्या. या जवळीकीचे भविष्यात काय होईल, हे काही सांगू शकत नाही. या पार्श्वभूमीवर निवृत्तीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या बाजूने आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेप्रमाणेच 1975-76 मध्ये वसंतदादांच्या निवृत्तीच्या घोषणा चर्चेत आलेली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून 1975 मध्ये आणीबाणीची घोषणा केलेली होती. त्यावेळी महाराष्ट्रात पाटबंधारे मंत्री असणार्या वसंतदादांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणे पसंत केले होते. महाराष्ट्राचे हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी दादांच्या वैयक्तिक आणि सहकारी संस्थांवर कारवाई सुरू केलेली होती. परिणामी दादांनी राजकीय संन्यास घेतलेला होता.
या घोषणेनंतर ते पद्माळे (मिरज) येथे राहिले होते. यापुढे विधायक कामातच लक्ष द्यावयाचे असे त्यांनी ठरवले होते. जनतेमध्ये विलक्षण लोकप्रिय असणार्या दादांची निवृत्ती लोकांना मान्य नव्हती. लोकांचा दादांच्या निवृत्तीस विरोध होता. त्यावेळी विलासराव शिंदे यांनी मोठ्या धाडसाने वसंतदादा निवृत्ती विरोधी कृती समिती स्थापन केलेली होती. या कृती समितीद्वारे जिल्हाभर दौरा करण्यात आला होता. समितीने निवृत्तीच्या विरोधात रान उठवले होते. छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर या समितीने जाहीर सभाही घेतलेली होती. सभेस तमाम दादाप्रेमी उपस्थित होते. अनेक नेत्यांनी या सभेस हजेरी लावलेली होती. दादांनी सक्रिय राजकारणात राहिले पाहिजे, असा आग्रह या सभेत व्यक्त झाला होता. आणीबाणीनंतर 1977 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि इंदिरा गांधींना पराभव स्वीकारावा लागला, हा सर्वश्रूत इतिहास आहे. राज्यातील काँग्रेस आमदारांनी तर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हटाव अशी भूमिका घेतलेली होती. यानंतरच्या राजकीय घडामोडीत वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे वसंतदादांच्या निवृत्तीच्या घोषणेच्या आठवणी जागा झाल्या. (Sharad Pawar resigns)
हेही वाचलंत का ?