हरिपूर मध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून | पुढारी

हरिपूर मध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : हरिपूर (ता. मिरज) येथे पूर्ववैमनस्यातून तिघांनी ट्रकचालक विक्रम रमेश वाघमारे (वय 35) याचा शनिवारी सकाळी काठी, दांडके, चाकूने मारून आणि डोक्यात दगडी पाटा घालून भरदिवसा निर्घृण खून केला. याप्रकरणी सोनाली विक्रम वाघमारे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खूनप्रकरणी आप्पासाहेब दिनकर पिंगळे (वय 54), राहुल आप्पासाहेब पिंगळे (30) आणि लता आप्पासाहेब पिंगळे (50, सर्व रा. पिंगळे मैदान, हरिपूर, ता. मिरज) यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सर्व हत्यारे जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आप्पासाहेब पिंगळे वीट विक्री एजंट आहेत. मृत विक्रम वाघमारे आणि संशयित राहुल पिंगळे हे दोघे मित्र होते. परंतु सन 2016 मध्ये विक्रम याने पिंगळे कुटुंबावर धारधार शस्त्राने हल्ला केला होता. याप्रकरणी राहुल याने विक्रम याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तो गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. तो मागे घेण्यासाठी विक्रम याने पिंगळे कुटुंबाकडे तगादा लावला होता. या कारणातून त्यांच्या वारंवार धुसपूस सुरू होती.

गुन्हा मिटविण्यासाठी विक्रम हा पिंगळे यांच्याकडे आज सकाळी गेला होता. त्यावेळी त्यांची जोरदार वादावादी झाली. वाघमारे व पिंगळे यांची मारामारी सुरू झाली. त्यानंतर तिघांनी विक्रम याला काठीने, दांडक्याने मारहाण केली. मुख्य संशयित आप्पााहेब पिंगळे याने दगडी पाटा विक्रम याच्या डोक्यात घातला.

डोक्यात वर्मी घाव बसल्याने विक्रम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. आप्पासाहेब हा रक्ताने माखलेल्या कपड्यांसह पोलिस ठाण्यात हजर झाला. राहुल आणि खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून लता यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

खुनाच्या प्रकारानंतर हरिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button