सांगली : शिकाऊंच्या भरवशावरच सिव्हिल हॉस्पीटल | पुढारी

सांगली : शिकाऊंच्या भरवशावरच सिव्हिल हॉस्पीटल

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  किडनीचा त्रास व्हायला लागला म्हणून काल वडिलांना अ‍ॅडमिट केलंय. तपासण्या सुरू आहेत; पण खात्रीनं कुणी काय सांगेना. सरांनी सांगितल्याशिवाय आम्ही कोणतीही ट्रिटमेंट करणार नाही म्हणून सांगतात. आता सरांना शोधायचं कुठं ते समजत नाही. सिव्हिलच्या व्हरांड्यात अस्वस्थ होऊन सैरभैर झालेल्या कुण्या एकाची ही व्यथा नाही, कुण्या एकाची ही घुसमट नाही तर अ‍ॅडमिट झालेल्या जवळपास सार्‍याच रुग्णांच्या नातेवाईकांची ही परिस्थिती आहे. रुग्णाला अ‍ॅडमिट तर करुन घेतलंय. तपासण्या तर सुरू आहेर, पण भरवसा काही वाटत नाही. खात्री देता येत नाही. कारण नातेवाईकांना रुग्णाबाबत खात्री द्यायला त्यांच्या वेळेला सिव्हिलमध्ये कुणी भेटत नाही, याची भीती प्रत्येकाच्या मनात दिसते आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे सिव्हिलचा कारभार शिकावू विद्यार्थीच सांभाळत आहेत.

जुन्या पेन्शन योजनेसाठी सारे सरकारी कर्मचारी संपावर आहेत, तसेच वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) 250 कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत. रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे, पण शेवटी ती पर्यायी व्यवस्था आहे. डॉक्टर संपात सहभागी झालेले नाहीत. नर्सेस, परिचारिका यांच्यासह 250 हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले. परिणामी, बाह्यरुग्ण विभागात एरवी दिसणारी घाई दिसत नाही. फारशी गर्दीही नाही.

आकस्मित दुर्घटना विभाग, अतिदक्षता विभाग, पोस्टमार्टेम विभाग, शस्त्रक्रिया विभाग, बाळंतपण विभाग सुरु आहेत. आम्ही संपावर असलो तरी आम्हाला पण माणुसकही आहे की. कुणीही सिरियस पेशंट आला की आम्ही सारी मदत करतो, अशी भावना चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. संघटनेचे नेते विजय वाघुले, रवींद्र श्रीवास्तव, संजय मोरे, विपूल सगरे आणि कर्मचारी सकाळी सिव्हिलमध्ये येतात. गेटवर झाडाखाली जमतात. संपाबाबत चर्चा करत बसतात. कुणी सिरियस पेशंट आला की मदतही करतात. 112 चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांपैकी 102 संपावर आहेत. दहा जण अत्यावश्यक सेवेसाठी तत्पर आहेत, तसेच 230 नर्सेसपैकी 20 नर्सेस अत्यावश्यकता म्हणून सेवा बजावत आहेत, अशी माहिती परिचारिका संघटनेचे जिल्हा सचिव सचिन बिरनगे यांनी दिली.

शेवटी माणुसकी महत्त्वाची

पोस्टमार्टम विभागही सुरू आहे. संप असला तरी कामात कसूर कशी करायची? त्यात आमचा विभाग म्हणजे पोस्टमार्टमचा. आजच एक पोस्टमार्टम करायचे आहे. शेवटी माणुसकी महत्त्वाची, अशी भावना पोस्टमार्टम विभागाचे बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.

Back to top button