सांगली : जुनी पेन्शनला विरोध करणार्‍यांना घरी बसवू; हजारो कर्मचार्‍यांचा निर्धार | पुढारी

सांगली : जुनी पेन्शनला विरोध करणार्‍यांना घरी बसवू; हजारो कर्मचार्‍यांचा निर्धार

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘कोण म्हणतेय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘जो पेंन्शन पर बात करेगा, वहीं देशपर राज करेंगा’, अशा घोषणा देत कर्मचार्‍यांनी सांगलीत रविवारी विराट मोर्चा काढला. जुनी पेन्शनला विरोध करणार्‍या घरी बसवू, असा इशारा कर्मचार्‍यांनी दिला.

कर्मवीर चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरूवात झाली. त्यानंतर राममंदिर चौक – काँग्रेस कमिटी चौक – स्टेशन चौक – राजवाडा चौकातून स्टेशन चौकात मोर्चा आला. या ठिकाणी जाहीर सभा झाली. मोर्चात जवळपास 120 संघटना सहभागी झाल्या होत्या.

माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुणअण्णा लाड, आ. विक्रम सावंत, माजी आ. भगवानराव साळुंखे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, जुनी पेन्शनचे राज्याचे नेते वितेश खांडेकर, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ लिहिलेल्या पांढर्‍या टोप्या घालून कर्मचारी सहभागी झाले होते. भरउन्हात कर्मचारी सहकुटुंब मोर्चात सहभागी झाले होते.

आ. अरुण लाड म्हणाले, गेली कित्येक वर्षे सुरू असणारी जुनी पेन्शन बंद करण्यात आली. विधानसभेत याबाबत जोरदार आवाज उठवणार आहे. आ. सावंत म्हणाले, जे कर्मचारी राज्य घडविण्याचे काम करतात त्यांच्यावर सरकार अन्याय करीत आहे. कर्मचार्‍यांना पेन्शन मिळण्यासाठी काँग्रेस सकारात्मक आहे. रोहित पाटील म्हणाले, हिमाचल प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांत जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, मग महाराष्ट्र शासन का करू शकत नाही? पेन्शन नाकारणार्‍या सरकारला घरी बसवा. वितेश खांडेकर म्हणाले, अनेक राज्यांत जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. मात्र राज्यात पेन्शन देण्याची सरकारची मानसिकता नाही. मात्र, जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत लढा थांबवणार नाही. जे नेते आपल्या लढ्यात सोबत असतील, भविष्यात त्यांच्याच पाठिशी राहणार.

यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अविनाश गुरव, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, प्रा. एन. डी. बिरनाळे, डी. जी. मुलाणी, पी. एन. काळे, पाटबंधारे महिला कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा संगीता मोरे, कर्मचारी सहभागी झाले होते.

हुकूमशाहीची वाटचाल लोकांना मान्य नाही : कदम

माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही. कर्मचार्‍यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठीसुद्धा सरकारला वेळ नाही. सध्या हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असणारी सरकारची वाटचाल कर्मचार्‍यांना मान्य नाही. किमान कर्मचार्‍यांबरोबर संवाद करून मध्यम मार्ग काढावा. पेन्शन ही कर्मचार्‍यांची हक्काची आहे. काँग्रेस पक्ष कर्मचार्‍यांच्या पाठीशी आहे. शेअर्समध्ये पेन्शनच्या नावाखाली नवा फंडा न आणता जुनी पेन्शन योजनाच लागू करावी.

टेन्शन लेने का नही, देने का :  पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली जिल्हा क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील आजच्या या मोर्चामुळे निश्चित क्रांती घडणार आहे. सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करतो, म्हणणार्‍या सरकारने सध्या अळीमिळीची भूमिका घेतली आहे. कर्मचार्‍यांच्या संपाची सरकारला भीती वाटू लागली आहे. त्यामुळे जोपर्यंत पेन्शन लागू केली जात नाही तोपर्यंत मोर्चा, संप थांबवायचा नाही. आता पेन्शनसाठी टेन्शन लेने का नही देणे का, असा सल्लाही त्यांनी दिला.

Back to top button