सांगली : विटा बस स्टॅन्डवर दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक | पुढारी

सांगली : विटा बस स्टॅन्डवर दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात बस स्टॅन्डवर सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला पकडले. अनु साई जाधव ( वय ४०, शिवाजीनगर गणपतीमंदीराजवळ जळगांव, जि. जळगांव ) असे संशयित महिलेचे नांव आहे. तिला विटा पोलिसांनी अटक केली आहे

याबाबत पोलिसांनी सांगितले की विटा बस स्थानकात काल संशयितरित्या एक महिला फिरत असल्याची माहिती पोलिस हणमंत लोहार व महेश देशमुख यांना मिळाली. त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना बस स्थानकात संशयित रित्या फिरणाऱ्या अनु जाधव या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता गर्दीचा फायदा घेत विटा – कोल्हापूर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून रोख रक्कम व सोन्याचे गंठण चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, फातिमा सलीम मुलाणी ( किणी वाठार, ता. हातकणंगले ) या महिलेने विटा बस स्थानकात बसमध्ये चढत असताना रोख दीड हजार रुपये व दोन लाख त्रेचाळीस हजार रूपयांचे ४८.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण कोणीतरी चोरल्याची फिर्याद ( ता. ६ ) विटा पोलिसात दिली होती. मुलाणी यांची रोख रक्कम व सोन्याचे गंठण चोरल्याची कबुली संशयित अनु जाधव या महिलेने दिली. तिच्या ताब्यातील दागिने जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button