मिरज : सोनीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली | पुढारी

मिरज : सोनीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली

मिरज; पुढारी वृत्तसेवा : सोनी (ता. मिरज) येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत 12 ठिकाणी चोऱ्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. चोरट्याने 58 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी डॉ. उदयसिंह बाळासाहेब जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनीमध्ये बुधवारी पहाटे दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे चोरट्याने फोडून अक्षरशः धुमाकूळ घातला. यावेळी चोरट्याने उदयसिंह जगदाळे यांचा दवाखाना फोडून तीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. गावातील उल्हास पाटील यांच्या घरातील 28 हजार पाचशे रुपये किमतीचे मंगळसूत्र, चांदीची मूर्ती व चांदीचा करंडा घेऊन पोबारा केला.

चोरट्याने विकास भट, नंदकुमार जगन्नाथ पाटील, शिवाजी पाटील बाळासाहेब पाटील यांचे घर फोडले. तसेच डॉ. जगदाळे, डॉ. विकास लेंगरे, डॉ. साहिल नदाफ, डॉ. कुंभार यांचा दवाखाना फोडला. तसेच तुषार चौगुले यांचे औषध दुकान, ज्ञानदीप औषध दुकान व प्रदीप सूर्यवंशी यांचे स्वराज्य औषध दुकान चोरट्याने फोडले. यासह राहुल कुंभार यांचे जनरल स्टोअर्स दुकान देखील यावेळी चोरट्याने फोडले.

त्यानंतर चोरट्याने गावातील जनरल स्टोअर्स दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. परंतु या जनरल स्टोअर्स मध्ये देखील चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. यावेळी दुकानाचे मालक राहुल कुंभार हे कुटुंबासमवेत दुकानातील पाठीमागच्या बाजूस असणाऱ्या घरात झोपले होते. परंतु त्यांना चोरीचा सुगावा देखील लागला नाही.

चोरट्याने सोनी गावातील दवाखाने, औषध दुकाने आणि घर टार्गेट केले होते. चोरट्याचे कृत्य डॉ. सचिन कुंभार व स्वराज्य औषध दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाले आहे.

चोरट्याने गावात एकाच रात्री 12 ठिकाणी चोऱ्या केल्याचे बुधवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आले. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळतात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख पथकासह पाहणी केली याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

फक्त दवाखाने आणि औषध दुकाने टार्गेट

सोनी मध्ये चोरट्याने दवाखाने आणि औषध दुकानेच टार्गेट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्याने फोडलेले एका औषध दुकानासमोर ज्वेलरी चे दुकान असताना देखील चोरट्याने ज्वेलरी दुकान फोडण्याचे सोडून दवाखाने आणि औषध दुकानांनाच टार्गेट केले होते.

चोरट्याची पूर्ण दक्षता : श्वान घुटमळले

सोनी मध्ये चोरी करत असताना चोरट्याने पूर्णपणे दक्षता घेतल्याचे दिसून येते. चोरट्याने तोंडावर मास्क व हाताला ग्लोज घातले होते. त्यामुळे श्वान देखील घुटमळले. चोरट्याचे एका सीसीटीव्ही चित्रीकरण झाले असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Back to top button