गणेश जयंती विशेष : १३८ वर्षांची परंपरा असलेला विट्यातील श्री गजानन जन्मोत्सव | पुढारी

गणेश जयंती विशेष : १३८ वर्षांची परंपरा असलेला विट्यातील श्री गजानन जन्मोत्सव

विट्यातील श्री भंडारे यांच्या घरातील श्री गणेशाची उत्सव मूर्ती
विट्यातील श्री भंडारे यांच्या घरातील श्री गणेशाची उत्सव मूर्ती
महाभागवत जोतीपंत कुलकर्णी यांचे चित्र

सांगली जिल्ह्यातील पुरातन विटे गाव आणि आताचे विटा शहर. या शहरात १३८ वर्षांपासून दरवर्षी माघ महिन्यात ‘श्री गजानन जन्मोत्सव’ साजरा केला जातो. यावर्षी रविवार दि. २२ जानेवारी ते गुरुवार दि. २६ जानेवारी या काळात मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जात आहे.

॥ घेऊनिया फरश करी । भक्त जनांचीं विघ्ने वारी ॥
॥ ऐसा गजानन महाराजा । त्याचे चरणी हालो लागो मांझा ।।। ॥ शेंदुर शमी बहु प्रिय ज्याला तुरा दुर्वांचा रोविला ।। ।। मूषक जयांचे वाहन । माथा मुगुट जडित पूर्ण ॥
॥ नाग यज्ञोपवित रुळे शुभ वस्त्र शोभित साजिरे ।
॥ भाव मोदक हारा भरी। तुका तैसा पूजा करी ॥ १ ॥

॥ सकळांचे बीज । ॐकार स्वरूप वारितसे ताप गणपती ।।
॥ अनाथांचा नाथ मोरेश्वर जाणा आवडतो प्राणा । आगळा तो ॥
॥ धन्य नाम शिवा । पावन संसारी निजानंद करी । शिवसूत ॥
॥ जोती म्हणे मज | प्रसन्न झालासी । वसे सुख राशी । विटे ग्रामीं ॥ २ ॥

पहिले स्तोत्र ( अभंग ) श्री संत तुकाराम महाराजांचा असून दुसरे स्तोत्र श्रीजोतीपंत महाभागवत, चिंचणेरकर यांचा आहे.

विट्यातील ब्राह्मण गल्लीतील श्रीगजानन मंदिराचा इतिहास

सांगली जिल्ह्यातील विटे येथे श्रीगणपतीचे स्वयंभू स्थान पुरातन काळचे प्रासादिक मंदिर आहे. सुमारे २२५ वर्षापूर्वी चिंचणेर (सातारा शहराच्या पूर्वेस ८ किलोमीटर अंतरावर) जोतीपंत या नावचे महाभागवत घराण्यातील महाभागाने येऊन २१ दिवस अनुष्ठान केले.

भक्त जोतीपंत हे लहानपणी आडदांड विद्याहीन होते. ते खोडकर, त्रासदायक व बेफाम वृत्तीने वागत होते. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले ते फिरत फिरत विटे ग्रामी आले. त्या वेळी फक्त दगडी गाभाऱ्याचे गणपतीचे देवालय होते. त्या भोवती निवडुंग, गवत वगैरे वाढल्यामुळे ते दिसत नव्हते.

त्या देवळाच्या दक्षिण बाजूने, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारा ओढा होता. तो म्हणजे आताचा चिरओहळ किंवा चिरवळ ओढ्यास मिळाला होता. विटे गावची मूळ वस्ती या ओढ्याच्या दक्षिण बाजूस उंचावर होती. या ओढ्याच्या उत्तर बाजूस हे गणपतीचे स्थान होते.

त्यावेळी जोतीपंत यांना साक्षात्कार झाला त्यांनी त्या गवत आणि निवडुंगांतून हे गणपतीचे देवस्थान शोधून काढले. त्यांनी त्या गणपतीची पूजा करून दर्शन घेतले आणि २१ दिवस फक्त निवडुंगातील दूर्वा भक्षण करून अनुष्ठान केले. २१व्या दिवशी पहाटे त्यांना साक्षात्कार झाला की,”तू काशीक्षेत्री जाशील आणि तेथे व्यासपीठावर बसून भागवत सांगशील.”

हा दृष्टांत झाल्यानंतर जोतीपंत काशीस गेले. तेथे एका ब्राह्मणाचे घरी उतरले. तेथे रात्री झोपल्यावर पुन्हा दृष्टांत झाला ‘तुझे उशाशी भागवत पोथी आहे. ती घेऊन व्यासपीठावर बैस. तूला आपोआप भागवत सांगतां येईल.” अशा प्रकारे या श्रीगजानन सिद्धिबुद्धिच्या दात्याच्या प्रसादाने एका अशिक्षित ब्राह्मणास अमोघ ज्ञान प्राप्त होऊन ते काशी क्षेत्री व्यासपीठावर बसून उत्तम प्रकारे भागवत सांगू लागले.

काशीतील विद्वान ब्राह्मणांनी त्यांचा सत्कार केला व त्यांचे पोथीची पालखीतून मिरवणूक काढली व त्यांना ‘महाभागवत’ ही पदवी अर्पण केली. अशा प्रकारे विद्वत्ता संपादून ते परत चिंचणेर गावी परत आले. अद्याप येथे महाभागवताची पोथी असून दररोज तिची पूजा होते. त्या गावी ‘महाभागवत ‘ घराणे आहे.

श्री भंडारे यांच्या घरातून माघी गणेशोत्सवासाठी उत्सव मूर्ती मंदिराकडे नेताना भंडारे कुटुंबीय श्री सुशांत भंडारे, श्री गजानन भंडारे,श्री मनीष भंडारे श्री भालचंद्र भंडारे आणि अन्य.

जोतीपंतांचे २१ दिवसांचे हे अनुष्ठान झालेनंतर भक्तमंडळींना हे देवस्थान स्वयंभू आणि प्रासादिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुढे या देवालयाचा जीर्णोद्धार विट्याच्या ग्रामस्थांनी केला. दरवर्षी माघ शु. १पासून ५ दिवस श्रीगणपती मंदिरात उत्सव होत आहेत. त्यानिमित्त भजन, पूजन, कीर्तन जन्मकाळ आणि प्रसाद अव्याहतपणे आजतागायत होत आहेत. त्याचप्रमाणे या मंदिरात दरमहा भक्तमंडळी संकष्टी चतुर्थी सामुदायिकरीत्या करीत असतात.

उत्सवमूर्ती श्री. कवीश्वर महाराज अग्निहोत्री मुक्काम नरसिंह वाडी हे येथे उत्सवाला आले. त्यांनी श्रींचे दर्शन घेतले आणि हे स्थान स्वयंभू आणि जागृत आहे याबद्दलची माहिती घेतली आणि उत्सवासाठी एक सुंदर पंचधातू मिश्रित मूर्ती त्यांनी आपले मेव्हणे श्रींचे निष्ठावंत भक्त श्री. दत्तात्रय केशव भंडारे यांच्याकडे दिली. ही मूर्ती त्यांच्या घराण्यात ठेवण्यात आली असून ही मूर्ती आजतागायत प्रति वर्षी उत्सवाच्या वेळी श्री. भंडारे यांच्या घरातून मिरवणुकीने देवालयात आणली जाते आणि उत्सव संपल्यानंतर त्यांच्या घरी पोहोचती केली जाते.

ही हकिकत याच जोतिपंत महाभागवत घराण्यातील श्री. कंदबुवा चिंचणेरकर कीर्तनकार यांनी याच श्रीगणपती उत्सवाच्या प्रसंगी कीर्तनात सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगितल्याचा इतिहास आहे.

संकलन – विजय भास्कर लाळे, (संदर्भ : श्री सिद्धेश्वर प्रेस विटे यांचे मार्फत प्रसिद्ध केलेले सन १९४४ मधील प्रसिद्धी पत्रक)

Back to top button