सांगलीत महिलेचे गंठण पळविले; 'धूमस्टाईल'ने चोरट्यांचे पलायन | पुढारी

सांगलीत महिलेचे गंठण पळविले; 'धूमस्टाईल'ने चोरट्यांचे पलायन

सांगली : पुढारी वृत्तसेवा : पत्ता विचारण्याचा बहाणा करून सरीता मिलिंद वडमारे (वय ३६) यांच्या गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसडा मारून ‘धूमस्टाईल’ पलायन केले. रामकृष्ण परमहंस सोसायटीत शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

अवघ्या काही क्षणात हा प्रकार घडला. चोरटे लगेच दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेले. या प्रकारामुळे वडमारे घाबरून गेल्या. त्यांनी आरडाओरड केली. परिसरातील लोक जमा झाले. काही तरुणांनी चोरटे गेलेले दिशेने दुचाकीवरून पाठलाग केला. मात्र ते सापडले नाहीत. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी रात्री आठपर्यंत परिसरात नाकाबंदी केली. संशयित दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र काहीच धागेदोरे लागले नाहीत.

पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. रात्री उशिरा वडमारे यांची फिर्याद घेण्यात आली. दोन अज्ञात चोरट्यशाविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे हे स्थानिक असावेत, असा संशय आहे. ते २५ ते ३० वयोगटातील होते.

पत्ता विचारण्याचा बहाणा…

सरीता वडमारे रामकृष्ण परमहंस सोसायटीत राहतात. शनिवारी सायंकाळी त्या त्यांच्या घरासमोर उभा होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन संशयित चोरटे आले. त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत दुचाकी थांबविली. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने वडमारे यांच्या गळ्यातील सोन्याचे चार तोळ्याचे गंठण हिसडा मारून लंपास केले.

Back to top button