महाराष्ट्रात पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली : अजित पवार यांचा आरोप | पुढारी

महाराष्ट्रात पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली : अजित पवार यांचा आरोप

मांजर्डे (सांगली); पुढारी वृत्तसेवा : कोणीही उठतो आणि कोणत्याही पक्षात जातो. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली जात असून अशी स्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला.

आरवडे (ता. तासगाव) येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार आरोप केले. कर्नाटक, मध्यप्रदेश मधील सरकार यांनी आमदार फोडून पाडली. अच्छे दिनाच्या नावाखाली गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली. खालच्या पातळीवरच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. राज्यात प्रचंड बेकारी वाढली आहे. राज्यामध्ये दीड ते दोन कोटी लाख रुपये होणारी गुंतवणूक दुसर्‍या राज्यात गेली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत होते, असा सवाल त्यांनी विचारला. या उद्योगामुळे बेकारी कमी झाली असती व छोटे-मोठे कारखाने तयार झाले असते. या सरकारला महिलांची मते पाहिजेत पण मंत्रिमंडळात वीस मंत्र्यात एक ही मंत्री महिला नाही. सहा महिने झाले मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. आमच्या काळात मंजूर केलेली कामे नवीन सरकारने स्थगित केली आहेत. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे.

तरुणांना सल्ला

तुमच्या अंगात पाणी आहे, आता शिवारात पाणी आले आहे आपण कर्तृत्ववान आहोत हे सिद्ध करा. अत्याधुनिक पद्धतीने कमी पाण्यात शेती करून उत्पन्न वाढवा. दिल्ली, मुंबईत काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मुलांनी वेगवेगळे उद्योग, व्यवसाय केले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक म्हणून उल्लेख

मी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणालो यात काय चुकल? त्यांनी महापुरुषांचा अपमान केला म्हणून आम्ही मोर्चा काढला, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा टुकारपणा केला. खर्‍याला खरं आणि चुकीला चूक म्हणायला शिका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आ. सुमन पाटील, आ. अरुण लाड, आ. मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, हणमंत देसाई, शंकर पाटील, ताजुद्दिन तांबोळी, अमोल शिंदे, बलगवडेचे सरपंच हणमंत शिंदे, दत्तात्रय हावळे, धनाजी पाटील, मोहन पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा :

Back to top button