सांगली : ‘वाळव्या’त भाजप-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला ! | पुढारी

सांगली : 'वाळव्या'त भाजप-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला !

इस्लामपूर : संदीप माने :  वाळवा तालुक्यातील पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी असल्याने निवडणुकीत चुरस वाढणार आहे. सभापतिपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जाणार आहे. सभापती पदासाठी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोपर्यंत लोकांना पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मंगळवारी झालेल्या आरक्षण सोडतीत अडीच वर्षांसाठी वाळवा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी पडले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय समीकरणांच्या जुळवा-जुळवीला वेग येणार आहे. पंचायत- जि. प. निवडणुकीला आगामी विधानसभेची किनार आहे.

तालुक्यातील स्थानिक राजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजेच माजी मंत्री जयंत पाटील गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधात भाजप व आघाड्यांचा कस लागणार आहे. भाजपमधील गटा-तटाचे राजकारण आणि नेत्यांचे मनोमिलन करणे वरिष्ठ नेत्यांना आव्हान ठरणार आहे. दोन तीन वर्षांत राजकीय समीकरणे बदलली. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि आ. मानसिंगराव नाईक एकत्र आल्याचा फायदा राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख हे भाजप बरोबर आहेत. राहुल, सम्राट महाडिक यांना राज्य पातळीवरील पदे देऊन भाजपने ताकद दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपला गट निर्माण केला आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे विक्रम पाटील, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, हुतात्मा गटाचे वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Back to top button