सांगली : तळीरामांचे नववर्ष गेले कोठडीत ! | पुढारी

सांगली : तळीरामांचे नववर्ष गेले कोठडीत !

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नशेत धुंद अवस्थेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात नशेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १२२ तळीरामांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा अपघात होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यातील कोठडीत टाकले. नववर्षाचे स्वागत तळीरामांना पोलिसांच्या कोठडीत केले.

‘थर्टीफस्ट’च्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजताच पोलिस रस्त्यावर उतरले. शहरासह ग्रामीण • भागातील प्रमुख चौक व महामार्गावर नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्री दहानंतर पोलिसांनी प्रत्यक्षात कारवाईला सुरूवात झाली.

शहरातील कॉलेज कॉर्नर, मुख्य बसस्थानक चौक, शास्त्री चौक, अंकली नाका, कर्मवीर चौक, विजयनगर, विश्रामबाग चौक, माधवनगर जकात नाका, बुधगाव येथील पोलिस चौकी, सांगलीवाडी या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. जिल्ह्याच्या सीमेवरही नाकाबंदी होती. संशयित वाहने व व्यक्तींची तपासणी करण्यात आली. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांना ताब्यात घेतले. त्यांची वाहनेही ताब्यात घेतली. अनेक तळीराम नशेत धुंद होते. त्यांचा अपघात होऊ नये, याची पोलिसांनीच काळजी घेतली. त्यांना थेट पोलीस कोठडीत टाकले. रविवारी सकाळी त्यांना सोडून दिले. पण त्यांची वाहने अडकावून ठेवण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आंचल दलाल, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. आंचल दलाल यांनी आष्टा (ता. वाळवा) येथे बेधडक कारवाई केली. तळीरामांनी धरपकड केली. हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दिला. पहाटेपर्यंत पोलिस रस्त्यावर होते. पोलिसांची नाकाबंदी पाहून अनेकांनी मार्ग बदलला. काही जणांना तर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

Back to top button