सांगली : पाडळीत चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली दहा घरे | पुढारी

सांगली : पाडळीत चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली दहा घरे

मांजर्डे; पुढारी वृत्तसेवा :   पाडळी (ता. तासगाव) येथे शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गावातील बंद असलेली १० घरे एका रात्रीत फोडून चांदीच्या वस्तू व रोख रक्कम लंपास केली. गावात एकाचवेळी १० घरे फोडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे गावात फिरताना दिसत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाडळी गावात शुक्रवारी रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. सर्व फोडलेली घरे बंद होती. तसेच दोन दवाखान्यांत चोरी केली. प्रताप यशवंत सुर्वे यांच्या घरातून चांदीच्या २०० ग्रॅम वजनाच्या समया व रोख रक्कम १००० रुपये चोरी, धनाजी पंढरीनाथ पाटील यांच्या घरातून ८० ग्रॅम चांदीचे दागिने, रॉकी उद्धव पाटील यांच्या घरातून २०० ग्रॅम दागिने, तर शिवाजी सयाजी शिंदे यांच्या घरातील चांदीची २० ग्रॅम चांदी व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. ज्ञानेश्वर नामदेव पाटील यांचे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील सर्व कपडे व सामान फेकून दिले. ते परगावी असल्यामुळे चोरट्यांनी किती माल लंपास केला हे समजू शकले नाही. सुरेश किसन शिंदे यांचे घर फोडले. चंद्रसेन यशवंत सुर्वे, किरण राजाराम सुर्वे यांचा दवाखाना देखील चोरट्यांनी फोडून एक हजार रुपये लंपास केले. तसेच दिलीप भगवान माने यांचे किराणा स्टोअर्सचे दुकानही चोरट्यांनी फोडून दोन हजार रुपये रक्कम चोरी केली. चंद्रकांत स्वामी यांच्या दवाखान्यात चोरट्यांनी ५०० रुपये चोरी गेली. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Back to top button