सांगली : जिल्ह्यातील ४९ बालकांचे जीवन फुलणार | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील ४९ बालकांचे जीवन फुलणार

सांगली;  पुढारी वृत्तसेवा : जन्मतःच काही बालकांना हृदय रोगाचा त्रास असतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. मात्र त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. तो सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ४१ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांचे जीवन फुलणार आहे.

दरम्यान, ही बालके मंगळवारी एस. टी.च्या दोन स्वतंत्र बसमधून त्यांच्या पालकांसह एस. आर.सी.सी. रुग्णालय मुंबईकडे रवाना झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बस मुंबईकडे मार्गस्थ झाल्या. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. कल्याणी शिंदगी, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस व संदीप मनोळी उपस्थित होते. मिरज तालुक्यातील
कवठेमहांकाळ २, जत ११, आटपाडी ३. कडेगाव १, खानापूर ३, पलूस ६, तासगाव ३, वाळवा ४, शिराळा ३ आणि
महानगरपालिका क्षेत्रातील ३ बालकांचा समावेश आहे.

२ कोटी खर्च अपेक्षित

शस्त्रक्रियेसाठी सुमारे दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च क्विन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व रोटरी क्लब ऑफ मुंबई, इतर धर्मादाय संस्था आणि दानशुरांच्या माध्यमातून करण्यात आहे. या मुलांना नवजीवन लाभणार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button