इस्लामपूर : प्रतीक पाटील-अलिका यांचा विवाह थाटात | पुढारी

इस्लामपूर : प्रतीक पाटील-अलिका यांचा विवाह थाटात

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक व उद्योजक राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शाही विवाह सोहळा रविवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात झाला. नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासह हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या विवाह सोहळ्याला जनसागर लोटला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, उत्पादनशुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई, खा. सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, सुनील तटकरे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खा. श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, खा. संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, बबनराव पाचपुते, दिलीप वळसे-पाटील, रामराजे निंबाळकर, खा. नितीन राऊत, बाळासाहेब पाटील, फौजिया खान, आदिती तटकरे, आ. सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड, सदाभाऊ खोत, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. अतुल भोसले, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, सम्राट महाडिक यांच्यासह राज्याचे आजी-माजी मंत्री तसेच अनेक खासदार-आमदारांची या विवाह सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर राज्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, उद्योग-व्यवसाय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावली.

विवाहासाठी राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर जय्यत तयारी केली होती. आ. जयंत पाटील यांच्यासह यांच्या पत्नी शैलजादेवी पाटील, बंधू भगतसिंग पाटील, जनार्दन पाटील, राजवर्धन पाटील, आदित्य व प्रणव भगतसिंग पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विवाहस्थळी मोठ्या प्रमाणावर बैठक व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई, प्रशस्त भोजन व्यवस्था, ठिकठिकाणी पार्किंग अशी जय्यत तयारी करण्यात आली होती.

राजारामबापू कुस्ती केंद्रापासून राजेबागेश्वार देवस्थानपर्यंतच्या भव्य पटांगणात हजारो खुर्च्यांसह भव्य आसन व्यवस्था करण्यात आली
होती.

जयंतराव झाले भावुक…

विवाहाच्या काही क्षण अगोदर प्रमुख मान्यवरांचे स्वागत करताना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आपल्या आई-वडिलांची पुण्याई व तालुक्यातील जनतेचे दोन पिढ्यांचे अखंड प्रेम याचा उल्लेख केला. त्यानंतर लोकनेते राजारामबापू पाटील व आई कुसुमताई यांचे नाव घेतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांचाही उल्लेख करताना पुन्हा मंत्री पाटील भावुक झाले. यावेळच्या काही क्षणांनी उपस्थित जनसागरदेखील काहीसा स्तब्ध झाला.

Back to top button