ए. वाय. आपलं ठरलंय..., व्यासपीठापुरतं मर्यादित राहायचं, अजित पवार यांचा सल्‍ला | पुढारी

ए. वाय. आपलं ठरलंय..., व्यासपीठापुरतं मर्यादित राहायचं, अजित पवार यांचा सल्‍ला

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : ‘ए. वाय. आपलं ठरलंय, व्यासपीठापुरतं मर्यादित राहायचं. इकडं, तिकडं फिरायचं नाही, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना रविवारी इस्लामपूर येथे दिला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रतीक यांच्या विवाह सोहळ्यासाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. प्रफुल्ल पटेल, आ. छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पवार यांची भेट घेतली. पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. तो मुद्दा पकडून पवार यांनी पाटील यांना ‘इकडे तिकडे जायचं नाही, व्यासपीठापुरतं मर्यादित राहायचं’, असे सांगितले.

पहिल्या रांगेत बसलेल्या अजित पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक राजकीय मंडळी आली होती. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पाटील हे तेथे आले. तेथे झालेल्या काही मोजक्या लोकांसमोरच्या चर्चेचा ऊहापोह लगेच सुरू झाला.

Back to top button