सांगली : जादा परताव्याच्या आमिषाने 31 लाखाला गंडा | पुढारी

सांगली : जादा परताव्याच्या आमिषाने 31 लाखाला गंडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : ब्रेटवेल ट्रेडर्स अ‍ॅड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून एक लाखांच्या गुंतवणुकीवर दहा महिन्यांत 70 हजार परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल 31 लाख 20 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दिलीप आबा जगदाळे (वय 43, रा. संजयनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
कंपनीचे संचालक अमित रमेश भंडारे (रा. कौलगे, ता. तासगाव) आणि रोहिणी दिनकर सूर्यवंशी (रा. सूर्यागाव, ता. पलूस) या संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. फसवणुकीचा प्रकार हा दि. 27 ऑक्टोबर 2021 ते दि. 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विजयनगर येथे घडला.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः संशयित अमित भंडारे आणि रोहिणी सूर्यवंशी यांनी ब्रेटवेल ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. विजयनगर चौकातील एका अपार्टमेंटमध्ये या कंपनीचे कार्यालय सुरू केले. फिर्यादी जगदाळे हे फळ व्यापारी असल्याने त्यांची ओळख भंडारे याच्याशी झाली. कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यास दहा महिन्यांत 75 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दोघांनी दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून जगदाळे यांनी 26 लाख रुपये गुंतवणूक केली. त्याचबरोबर अन्य दोघांनी 3 लाख 20 हजार 500 रुपये आणि दोन लाख असे तिघांचे मिळून 21 लाख 20 हजार 500 रुपये गुंतवणूक केली.

यानंतर वर्ष उलटले तरी परतावा मिळत नसल्याने त्यांनी दोघांना जाब विचारला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. यानंतर काही दिवसांतच कंपनीचे कार्यालय बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच जगदाळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या ब्रेटवेल ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोघा संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button