एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारा जेरबंद | पुढारी

एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारा जेरबंद

सांगली : पुढारी वृत्तसेवा

एटीएम कार्डची अदलाबदल करून येथील वृद्धास १ लाख १३ हजार रुपयांचा गंडा घालणार्‍या संशयितास पोलिसांनी अटक केली. अमोल दिलीप सकटे (वय २९, रा. सावर्डे, ता. हातकणंगले ) असे संशयीताचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी, विविध बँकांचे एटीएम, मोबाईल असा ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली

पोलिसांनी सांगितले, शिवपुत्र इराप्पा सोलापुरे (वय ६२) हे बँकेचे मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी मार्केट यार्ड परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. स्टेटमेंट घेतल्यानंतर ते बाहेर आले. त्यावेळी संशयित अमोल सकटे याने त्यांना ‘तुमचे कार्ड मशीनमध्येच राहिले आहे, ते घेऊन जा’, असे सांगितले. संशयिताने अगदी चलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केली. ते सोलापुरे यांना लक्षात आले नाही. ते एटीएम घेऊन घरी गेले.

त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेण्यात आली. सुमारे १ लाख ३१ हजारांची रक्कम होती. फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते.

त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्रिमुर्ती पोलिस चौकीजवळ सकटेला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्याकडे विविध बँकेचे एटीएम कार्ड मिळून आले. विश्वासात घेवून माहिती घेतली असता सोलापुरे यांचे एटीएम कार्ड बदलून रक्कम काढून घेतल्याची कबुली त्याने दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

हेही वाचले का? 

Back to top button