सांगली : जिल्ह्यात ‘लम्पी’चा विळखा होतोय घट्ट; तीन महिन्यांत 4568 पशुधनांना लागण | पुढारी

सांगली : जिल्ह्यात ‘लम्पी’चा विळखा होतोय घट्ट; तीन महिन्यांत 4568 पशुधनांना लागण

सांगली; संजय खंबाळे :  जिल्ह्यात दिवसेंदिवस लम्पी स्किनचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तसेच मृत्युदराचा आलेख चढतो आहे. तीन महिन्यात 4 हजार 568 जनावरांना बाधा झाली आहे. तसेच लम्पीची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण 6.83 टक्के आहे. प्रशासन काही प्रमाणात लम्पीला रोखण्याठी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे असे यश येताना दिसत नाही. त्यामुळे या आजाराला रोखणे आज मोठे आव्हान झाले आहे.

दोन महिन्यांपूर्वी राज्यभर लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकाही जनावरांना लागण झाली नव्हती. मात्र, जिल्ह्यात दि. 5 सप्टेंबररोजी वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि चिकुर्डेतील जनावरांना पहिल्यांदा लागण झाली. सातार्‍यामध्ये शर्यतीला गेलेल्या बैलापासून जिल्ह्यात आजाराचा शिरकाव झाला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, लागण कशामुळे झाली, याची ठोस माहिती मिळालीच नाही.

जिल्ह्यात वाळवा तालुक्यातूनच कोरोना आणि लम्पीची सुरुवात

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोनाचा संसर्गाची सुरुवात वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमधून झाली. तसेच लम्पीचा प्रादुर्भावही वाळवा तालुक्यातूनच झाला. दोन्ही गंभीर आजाराची सुरुवात वाळवा तालुक्यातूनच झाल्याने दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा होत आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला एक-दोन बाधितांची संख्या आज शेकडोच्या घरात गेली आहे. दररोज शेकडोच्या संख्येने जनावरांना लागण होत आहे. दि. 2 नोव्हेंबररोजी सर्वाधिक जनावरांना बाधा झाली. जिल्ह्यात सोमवारच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 4 हजार 568 जनावरांना लम्पी स्किनची लागण झाली आहे. यातील 1 हजार 480 पशुधन बरे झाले आहे. तसेच 2 हजार 779 जनावरांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तसेच या आजाराच्या प्रादुर्भावाने एकूण 310 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस संसर्ग आणि लागण होऊन मृत्यू होण्याचा आलेख वाढतो आहे.

एका जनावराची किंमत आज कमीत कमी 1 लाख रुपयांच्या घरात आहे. अनेक पशुपालकांनी कर्ज काढून पशुधनांचे संगोपन केले आहे. मात्र, डोळ्यादेखत जनावरांचा बळी जाताना पाहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. वेळीच याबाबत ठोस उपाययोजना केल्या नाही तर परस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्व यंत्रणा मैदानावर उतरवून ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

म्हशींना लागण नाही

जिल्ह्यात सुमारे 3 लाख 24 हजार 756 इतकी गाय आणि बैलांची संख्या आहे. तसेच 4 लाख 93 हजार 998 म्हैशी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत लागण झालेल्या 4 हजार 362 जनावरांमध्ये एकाही म्हशीला लम्पीची लागण झालेली नाही. लागण झालेल्यामध्ये बैल, गाय, वासरांचा समावेश आहे.

लम्पीचे प्रसारक

माशा, डास, गोचिड, चिलटे यापासून या आजाराचा संसर्ग होतो. तसेच बाधित झालेल्या जनावरांना स्पर्श करुन निरोगी पशुधनाला स्पर्श केल्यास याची लागण होण्याची शक्यता आहे.

310 जनावरांचा बळी : नुकसान लाखात; मदत हजारात

जिल्ह्यात लम्पी स्किनची लागण होऊन 150 गाय, 65 बैल आणि 95 वासरे अशा एकूण 310 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आज एका जनावराची किंमत लाखों रुपयांच्या घरात आहे. मात्र, शासनाकडून मृत्यू झालेल्या गायीच्या पशुपालकांना 30 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. तसेच बैलासाठी 25 हजार आणि वासरांच्या पशुपालकांना 16 हजार रुपये देण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान लाखात होत असताना मदत हजारात मिळत असल्याने शेतकर्‍यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लसीकरण तरीही संसर्गाचा आलेख वाढतोय !

लम्पीला रोखण्यासाठी सप्टेंबरपासून गाय, बैलांना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात करण्यात आले. 3 लाख 31 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले. उपचार आणि लसीकरणासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. लस देऊन 21 दिवसानंतर जनावरांना आजाराचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक जनावरांना हा कालावधी पूर्ण होऊनही बाधा झाल्याची चर्चा आहे. लसीकरणानंतर संसर्गाचा आलेख वाढत आहे.

औषधासाठी पळापळ : झाडाझडती घेण्याची मागणी

जिल्हा प्रशासनाकडे लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर लागणारी औषध उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काही बाधित जनावरांचे पशुपालक प्रशासनाकडून काही औषध उपलब्ध होत नसल्याची माहिती देत आहेत. महागडी औषध उपलब्ध करताना शेतकर्‍यांची पळापळ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी औषधाच्या उपलब्धतेची झाडाझडती घेण्याची मागणी होत आहे.

Back to top button