सांगली : कर्मवीर विद्यालय ते ऐतवडे बुद्रुक रस्त्यावरील पूल पाण्याखाली | पुढारी

सांगली : कर्मवीर विद्यालय ते ऐतवडे बुद्रुक रस्त्यावरील पूल पाण्याखाली

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा :  येथील कर्मवीर विद्यालय ते ऐतवडे बुद्रुकदरम्यानच्या ओघळींवरील कमी उंचीचा पूल असल्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाणी येते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेची वाट धरावी लागते. अशा परिस्थितीमुळे पालकांत कमालीची चिंता निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यापूर्वी या पुलाची उंची वाढवून शाळेत जाणारा मार्ग सुरक्षित करावा, अशी या परिसरातील पालकांची मागणी आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा मारलेल्या चरी मुजल्या आहेत. त्यामुळे मोठा पाऊस झाला की, तुंबलेले पाणी रस्त्यावर येते व तत्काळ हा कमी उंचीचा पूल पाण्याखाली जातो. पुलावर दोन-तीन फूट पाणी असतानादेखील धोका पत्करत मुले या पाण्यातून वाट काढीत शाळेकडे जातात. स्थानिक लोकप्रतिनिधींना व शाळा व्यवस्थापन समितीला पालकांनी अनेकवेळा निवेदन देऊनदेखील या पुलाच्या उंचीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात आ. मानसिंगराव नाईक यांना हनुमान दूध संस्थेचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. कलगौंडा पाटील, भाऊसाहेब पाटील यांनी निवेदन दिले आहे.

पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेकडे तसेच घरी जावे लागते. शिक्षकांबरोबर पालकांनाही मुलांची काळजी लागून राहिलेली असते. त्यामुळे हा रस्ता व ओघळीवरील पुलाची उंची वाढवून मिळावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत विनाअडथळा येता येईल.                             – यू. बी. वाळवेकर, मुख्याध्यापक

Back to top button