सांगली : महिला तलाठी लाच घेताना जाळ्यात | पुढारी

सांगली : महिला तलाठी लाच घेताना जाळ्यात

सांगली, पुढारी वृत्तसेवा : शासनाने पुनर्वसनसाठी जमीन संपादित करताना चुकलेली 7/12 वरील आणेवारी दुरूस्त करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेणार्‍या खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथील महिला तलाठी मनीषा मोहनराव कुलकर्णी (वय 37, रा. ब्राम्हणपुरी, इस्लामपूर) हिला रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खेराडे-वांगीतील तलाठी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व जबाब घेण्याची कार्यवाही सुरू होती. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कडेगाव परिसरातील आहेत. त्यांच्या वडिलांची जमीन शासनाने पुनर्वसन करण्यासाठी घेतली होती. पुनर्वसनासाठी संपादित करताना चुकलेली 7/12 वरील आणेवारी दुरूस्त करून देण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज सादर केला होता. यासाठी तलाठी मनीषा कुलकर्णी हिने 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम दिली तरच चुकलेली आणेवारी दुरुस्त करून दिली जाईल, असे तिने सांगितले. शेवटी चर्चेअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागातील पथकाने तक्रारीची चौकशी केली.

त्यावेळी कुलकर्णी हिने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. लाचेची रक्कम सोमवारी देतो, असे तक्रारदाराने सांगितले. तत्पूर्वी पथकाने तलाठी कार्यालयात सापळा लावला. कुलकर्णी हिने लाचेची रक्कम घेतल्याचा सिग्नल मिळताच तिला रंगेहाथ पकडण्यात आले. अटकेतील कुलकर्णीला मंगळवारी (दि. 11) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, स्वप्नील भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button