आष्टा-इस्लामपूर रोडवर अपघात : 14 जखमी | पुढारी

आष्टा-इस्लामपूर रोडवर अपघात : 14 जखमी

आष्टा, पुढारी वृत्तसेवा : आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर येथील शिंदे मळ्याजवळ सोमवारी दुपारी माल वाहतूक ट्रक व बस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालक व चार विद्यार्थ्यांसह 14 प्रवासी जखमी झाले.आष्टा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे – साक्षी तानाजी गायकवाड (वय 18, आष्टा), जयश्री दत्तात्रय शिंदे ( वय 55), राजश्री दिलीप शिंदे (वय 48, दोघीही रा. आष्टा शिंदे मळा), सुभान सलाते (वय 18, रा. आष्टा), स्वप्निल संजय औताडे (वय 18, रा. आष्टा), यशराज विजय कुंभार (वय 19, रा. आष्टा), संकेत दिलीप वडगावकर (वय 19, रा. आष्टा), बसचालक हारूण हसीन मुलानी (वय 53), व वाहक नबी इकबाल आगा (वय 42, दोघेही रा. इस्लामपूर), पार्वती आत्माराम पवार (वय 60, रा. कराड), शारदा बळवंत गुरव (वय 60) व बळवंत शंकर गुरव (वय 65, रा. सांगलीवाडी), शुभांगी अमर गुरव (वय 32), व अनुसया संपत गुरव (वय 50, रा. शिगाव, ता. वाळवा). जखमींना हात, पाय, डोके आदी ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार दि.3 रोजी दुपारी या अपघातातील एस.टी.बस (क्र.एम. एच.20 बी.एल. 0235)ही इस्लामपूर कडून सांगलीकडे निघाली होती. तर माल वाहतूक ट्रक (क्र.एम.एच.26 बी.डी.4949) हा सांगलीकडून इस्लामपूरकडे निघाला होता. दरम्यान, येथील शिंदे मळ्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की, आष्ट्याच्या दिशेने जाणार्‍या बसचे तोंड फिरून इस्लामपूरच्या दिशेला झाले. ट्रकने ही बस इस्लामपूर दिशेकडे सुमारे दीडशे फूट फरफटत नेली. नंतर ट्रक तेथून पुढे पाचशे फूट गेला. या अपघातात बस चालक व चार विद्यार्थ्यांसह एकूण 14 प्रवासी जखमी झाले.

जखमींना संजय ठिंगळे व साजन अवघडे यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालय व येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे. घटनास्थळी आष्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, सहायक पोलिस फौजदार संजय सनदी, पोलिस कर्मचारी तसेच एस. टी. महामंडळाच्या सहाय्यक वाहतूक अधिकारी वासंती जगदाळे यांनी जखमींची विचारपूस केली. अपघाताचा पंचनामा केला.

Back to top button