सांगली : विहिरीत बुडून आजोबासह नातवाचा मृत्यू | पुढारी

सांगली : विहिरीत बुडून आजोबासह नातवाचा मृत्यू

जत, पुढारी वृत्तसेवा : रेवनाळ (ता.जत) येथील कुलाळवस्ती येथे आजोबा आणि नातवाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला. आबा काड्याप्पा कुलाळ (वय ६०), कार्तिक बिरू कुलाळ (वय ३) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या आजोबा व नातवाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोघांचेही मृत्यूदेह सांगोला येथील जीवरक्षक दलाने रात्री सात वाजता बाहेर काढले आहे. या घटनेने रेवनाळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेवनाळ येथील कुलाळ वस्तीवरील आबा कुलाळ यांनी शेळ्या चारायला रानात जात होते. घरातून बाहेर पडताना त्यांच्या मागे सर्वांची नजर चुकवून नातू कार्तिक बिरू कुलाळ मागे आला होता. रानात घरापासून काही अंतरावरच एक विहीर आहे. याच विहिरीच्या बाजूने पायवाट जाते. या पायवाटावरून आजोबाच्या मागे नातू कार्तिक जात होता. परंतु रस्त्यावरून जात असताना गवतात पाय अडकल्याने तो विहिरीत पडला. यावेळी आजोबांनी आवाज ऐकल्याने नातवाला विहिरीतून काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आजोबाचाही यादरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला.

दरम्यान यावेळी विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज शेजारी शेतात काम करणाऱ्या महिलांनी ऐकला होता. विहीर काटोकाठ भरल्याने दोघांना बाहेर काढणे शक्य नव्हते. दुपारी सांगोला येथील जीव रक्षक दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी रात्री सात वाजण्याच्या सुमारास दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button