सांगली : कन्नड शाळेत मराठी, हिंदी भाषेवर अन्याय; पालकांत नाराजी | पुढारी

सांगली : कन्नड शाळेत मराठी, हिंदी भाषेवर अन्याय; पालकांत नाराजी

जत; विजय रूपनूर :  तालुक्यातील कन्नड माध्यमाच्या 35 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत सुगम भारती (हिंदी) व मराठी पाठ्यपस्तिका अद्याप मिळालेल्या नाहीत. शासनाने पहिली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तक देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थीना सुगम भारती (हिंदी) व मराठी पाठ्यपुस्तक मिळाले नसल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागातील प्रथम सत्र कालावधी संपत आला तरीही सध्या हिंदी सुगम भारतीचे पुस्तक विद्यार्थ्यांना मिळाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी, गृहपाठ लिहिण्यासाठी अडचणीची होत आहे. याबाबत संबंधित प्राथमिक शाळेने शिक्षण विभागाकडे मागणी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. मुळातच कन्नड माध्यमाची हिंदी व मराठी पाठ्यपुस्तक हे शासन मोफत देत असल्याने बाजारात विक्रीस उपलब्ध नाहीत.

दरम्यान, शिक्षण विभागाला सुगम भारती (हिंदी) या विषयाऐवजी मराठी सुलभभारती हे पुस्तक सुरुवातीला देण्यात आले होते. हे पुस्तक शिक्षकांनी हिंदी व इंग्रजी माध्यमासाठी असल्याचे स्पष्ट करीत पुस्तक पंचायत समितीला परत केले होते. त्यानंतर पंचायत समितीने कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी सुगम भारती (हिंदी) व मराठी पुस्तके लवकरात लवकर मागवून घेऊन विद्यार्थ्यांना देऊ, असे सांगितले होते. परंतु चार महिन्याचा कालावधीनंतर तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. ही गंभीर बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्षात घ्यावी असेही पालक यांचे म्हणणे आहे.

जालिहाळ बुद्रुकचे शालेय व्यवस्थापन समितीचे काडाप्पा मुचंडी म्हणाले, अध्यक्ष सुगम भारती हिंदी व मराठी पुस्तक दुकानात मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला अडचणीचे ठरत आहेत. तरी लवकरात लवकर कन्नड माध्यमातील शाळांना (हिंदी) सुगम भारती व मराठी पुस्तक देण्यात यावे व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी.

पुस्तकासाठी पंचायत समितीकडे संपर्क करा : साळुंखे

जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतिलाल साळुंखे म्हणाले, सुरुवातीच्या पंचायत समितीकडे हिंदी, कन्नड माध्यमातून असणारे सुगम भारती हे पुस्तक नव्हते. यापूर्वीच विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तके जमा करून घेऊन तीच चालू वर्षातील विद्यार्थ्यांना द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही शाळेत (हिंदी) सुगम भारतीचे पुस्तक मिळाले नसल्यास त्यांनी पंचायत समितीकडे संपर्क साधावा. त्यांना उपलब्ध देण्याची व्यवस्था केली जाईल.

Back to top button