सांगली : सांगोल्यात सापडली 35 गाढवे! | पुढारी

सांगली : सांगोल्यात सापडली 35 गाढवे!

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  गाढवांची चोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीने पंधरा दिवसापूर्वी सांगलीतून चोरलेली 35 गाढवे सोलापूर जिल्ह्यातून सांगोल्यात बांधून ठेवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहर पोलिसांचे पथक या गाढवांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या रमेश परशू बजंत्री (वय 24), संगाप्पा उर्फ बाळू यमनाप्पा बजंत्री (26), बाळाप्पा उर्फ यमनाप्पा बजंत्री (25) व लक्ष्मण स्वामी गाणगेळ (32, चौघे रा. तेरदाळ, जि. बागलकोट, राज्य कर्नाटक) या चौघांची रविवारी जामिनावर मुक्तता झाली. गाढवे पळवून नेण्यासाठी जप्त केलेल्या टेम्पो मात्र पोलिसांनी अटकावून ठेवला आहे.

शहरातील गावभागातून गाढवे चोरून ती टेम्पोत भरून नेत असताना या चौघांनी गाढवांच्या मालकांनी रगेहाथ पकडले होते. त्यांना बेदम चोप देऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. स्थानिक गुन्हेगारही त्यांच्या टोळीत आहेत. एकूण पंधरा जणांची ही टोळी आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते गाढवे चोरून त्याची आंध्र प्रदेश व हैद्राबादमध्ये विक्री करीत आहेत. तेथून ही गाढवे चीनमध्ये पाठविला जातात.
गाढव मालक गुजरातमधून एक गाढव पंधरा हजाराला खरेदी करून आणणात. ही टोळी मात्र एका गाढवामागे त्यांना विकून किमान 35 ते 40 हजार रुपये मिळवितात, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. पंधरा दिवसातून किमान एखदा सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात ही टोळी येत असे. एकावेळी किमान ते पंधरा ते वीस गाढवांची चोरी करून जात असत. पंधरा दिवसापूर्वी त्यांनी 35 गाढवे चोरली होती. ही गाढवे त्यांनी सांगोल्यात बांधून ठेवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या गाढवांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

दरम्यान, अटकेत असलेल्या चौघांना रविवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. त्यांचा टेम्पो जप्त केला आहे. तो कोणाच्या नावावर आहे, याबद्दल आरटीओ कार्यालयातून माहिती मागविण्यात आली आहे.

टोळीतील 11 जणांचा शोध सुरू

गाढवे चोरणारी 15 जणांची टोळी आहे. सध्या चौघे सापडले आहेत. अन्य 11 पैकी सांगोल्यातील-1, मिरज-3, पंढरपूर-2, मोहोळ-1, माळशिरस-4 येथील आहेत. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्यांना अटक करण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button