Dipak Kesarakar : शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करणार नाही; शिक्षणमंत्री दीपक केसरकर | पुढारी

Dipak Kesarakar : शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करणार नाही; शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आरडाओरडा केला म्हणून दबणार नाही. शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करा, ही मागणी कदापिही मान्य करणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण संस्था महामंडळाच्या महाअधिवेशनात संस्था चालकांना ठणकावून सांगितले. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती करणार आहोत. आरटीई प्रतिपूर्तीसाठी 200 कोटींची तरतूद केली आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी सांगलीत धनंजय गार्डन येथे झाले. अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे होत्या. पालकमंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुमनताई पाटील प्रमुख पाहुणे होते.

केसरकर म्हणाले, पवित्र पोर्टलमुळे दर्जेदार शिक्षक मिळत नाहीत असे म्हणत असाल तर ते शंभर टक्के असत्य आहे. पवित्र पोर्टलद्वारे भरती सुरू झाल्यापासून शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे.पवित्र पोर्टलमधून भरती नको; मग काय मुलगा, सून, नातेवाईकांना शिक्षक म्हणून भरती करायचे आहे का? शिक्षक दर्जेदारच असला पाहिजे. विद्यार्थी हित बाजुला ठेवून चुकीचा निर्णय होणार नाही.

Back to top button