सांगली : विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

सांगली : विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

पलूस; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बांबवडे येथे रस्त्यावर पडलेल्या 11 केवी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला. अस्लम ऊर्फ ताजुद्दिन मुहम्मद मुल्ला (वय 56) असे या मृत शेतकर्‍याचे नाव आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महावितरण अधिकार्‍यांना घेराओ घालून धारेवर धरले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुल्ला हे पहाटे सायकलवरून शेतात जात होते. त्यावेळी 11 केवी उच्चदाबाची विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर पडलेली होती. मुल्ला यांना तारेचा स्पर्श होताच त्यांना विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यापासून अडीच तास विद्युत प्रवाह सुरू होता. नागरिकांनी महावितरण अधिकार्‍यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधीर शिंदे, विटा कार्यकारी अभियंता विनायक इदाते, पलूस सहायक अभियंता गणेश म्हेत्रे, राणी मराठे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी महावितरणाच्या अधिकार्‍यांना घेराओ घालत धारेवर धरले. महावितरणाकडून मृताच्या वारसांना 25 लाखांची भरपाई मिळावी, सहायक अभियंता यांना निलंबित करा, अशी मागणी केली.

अपघाताची सखोल चौकशी करून मृताच्या वारसांना जास्तीत- जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अपघाताप्रकरणी दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. तसेच चौकशीकामी हस्तक्षेप टाळण्यासाठी शाखा अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे.
– विनायक इदाते
विटा- कार्यकारी अभियंता

Back to top button