सांगली : नगरसेवक पुत्रांवरील कारवाई ही सलामी; स्थायी सभापतींनी दिले संकेत | पुढारी

सांगली : नगरसेवक पुत्रांवरील कारवाई ही सलामी; स्थायी सभापतींनी दिले संकेत

सांगली : पुढारी वृत्तसेवा : महापौर निवडणुकीत तटस्थ राहिलेले राष्ट्रवादी संपर्कातील भाजप नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्या दोन मुलांना महापालिकेच्या मानधनी सेवेतून कमी केल्याची कारवाई ही पहिली सलामी आहे, असे संकेत स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिले आहेत. दरम्यान, महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी संपर्कात राहिलेले भाजपचे 9 नगरसेवक आपल्या अजेंड्यावर असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे. वेगवेगळ्या आघाडीवर नाकेबंदी करून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिकेत 78 पैकी भाजपचे 41 व भाजप सहयोगी 2 नगरसेवक आहेत. मात्र फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना 39, तर भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना 36 मते पडली होती. मते फुटल्याने भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला होता. भाजपचे सहापैकी पाच नगरसेवक अद्याप राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिरज येथे घेतलेल्या बैठकीला भाजपचे राष्ट्रवादी संपर्कातील नगरसेवक/नातेवाईक उपस्थित होते. महापौर निवडणुकीत गैरहजर राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अप्रत्यक्ष मदत केलेले आनंदा देवमाने यांनी समाजकल्याण सभापती निवडणुकीत भाजपला साथ दिल्याने त्यांना पक्षाने क्षमापित केले आहे.

बहुमत असतानाही महापौर निवडणुकीत पराभव झालेले धीरज सूर्यवंशी नुकतेच स्थायी समिती सभापती निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी महापौर निवडणुकीतील हिशेब चुकते करण्यास सुरुवात केली आहे. पहिला झटका दुर्वे यांना बसला आहे. महापालिकेत मानधनावर नियुक्त असलेल्या त्यांच्या दोन मुलांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे चर्चांना धुमारे फुटले आहेत. दरम्यान, ही कारवाई म्हणजे सलामी असल्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. महापौर निवडणुकीत भाजपचे 9 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. या 9 नगरसेवकांची वेगवेगळ्या आघाडीवर नाकेबंदी करण्याचे संकेत सभापती सूर्यवंशी यांनी दिले आहेत. पक्षाने काहींना क्षमा केली असले तरी आपल्या स्तरावर हिशेब चुकते होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय धुसफुस वाढणार असल्याचे दिसत आहे.

नगरसेवकांवरील कारवाईला येणार वेग

महापौर निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर भाजपचे तत्कालीन गटनेते विनायक सिंहासने यांनी सहा सदस्यांविरोधात सदस्यत्व अपात्रतेसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील सादर केलेले आहे. मध्यंतरी पक्षादेशानुसार देवमाने यांना क्षमापित केल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना सादर केले होते. उर्वरित 5 नगरसेवकांवरील कारवाईसाठीची सुनावणी प्रलंबित आहे. राज्यातील सत्तांतरामुळे सदस्यत्व अपात्रता कारवाईला आता बळ येणार आहे. त्यादृष्टीने हालचाल सुरू झाल्याचेही संकेत देण्यात आले.

Back to top button