सांगली : 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या 385 शाळा होणार बंद? | पुढारी

सांगली : 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या 385 शाळा होणार बंद?

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत. या शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, याची माहिती शासनाकडून मागविण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्यात 0 ते 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

2023-24 या वर्षापासून शासनाचा नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा विचार सुरू आहे. या धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाकडून करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. नुकतेच शासनाने राज्यातील 0 ते 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागवली आहे. तसेच संच मान्यनेतुनसार मंजूर शिक्षक, शिक्षकेत्तर पदे, रिक्त पदे, भरलेली पदे याची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळेबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी जोरात हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी, कन्नड, उर्दू माध्यमिकच्या 1 हजार 688 शाळा आहेत. यातील 385 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे. या सर्व शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार 275 आहे. जत तालुक्यातील 92 शाळेमध्ये सर्वाधिक 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. नव्या धोरणानुसार या शाळा बंद होण्याची शक्यता आहे.

याबाबत शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधारक माने म्हणाले, वाडी, वस्तीवरील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे, हा त्याचा अधिकार आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या तर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे शाळा बंद करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये. अनेक शाळेत पटसंख्या वाढली आहे. मात्र शासनाकडून जर 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या तर विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भावना व्यक्त होत आहे.

तालुकानिहास पटसंंख्या

तालुका              पटसंख्या
आटपाडी               67
जत                       92
कवठेमहाकांळ       27
खानापूर                 32
मिरज                      6
पलूस                     13
शिराळा                  57
तासगाव                  28
वाळवा                    41
कडेगाव                  22
एकूण                   385

Back to top button