सांगली : टाकळीत ग्रामस्थ येताच चोरट्यांनी काढला पळ | पुढारी

सांगली : टाकळीत ग्रामस्थ येताच चोरट्यांनी काढला पळ

मिरज : पुढारी वृत्तसेवा : टाकळी (ता. मिरज) येथे रात्री चोरीच्या प्रयत्नात असणार्‍या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेल्या चोरट्यांनी चोरलेले साहित्य तेथेच टाकून पळ काढला.

रविवारी रात्री मल्लेवाडी येथील एका विहिरीवरील विद्युत मोटार चोरून चोरटे टाकळीमध्ये एका शेतकर्‍याच्या विहिरीवरील विद्युत मोटार चोरण्यासाठी आले होते. याची कुणकुण गावातील तरुणांना लागली. तरुणांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. ग्रामस्थ आल्याचे पाहून चोरट्यांनी चोरलेले साहित्य तेथेच टाकून पळ काढला.

चोरट्यांनी चोरलेले दोन विद्युत मोटार, केबल आणि एक मोटारसायकल तरुणांना मिळून आली. तरुणांनी सर्व साहित्य ग्रामपंचायतीत जमा केले. चोरट्यांनी चोरलेली मल्लेवाडी येथील एका शेतातील कूपनलिकेमधील सबमर्सिबल मोटार व केबल ग्रामस्थांनी त्यांना परत दिली.

Back to top button