सांगली : कवलापुरात एकाचा निर्घृण खून; भरदिवसा थरारक पाठलाग | पुढारी

सांगली : कवलापुरात एकाचा निर्घृण खून; भरदिवसा थरारक पाठलाग

सांगली : पुढारी वृत्तसेवा : बुधगाव (ता. मिरज) येथील विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय 38) यांचा थरारक पाठलाग करून धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. कवलापूर येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर सोमवारी भरदिवसा ही घटना घडली.

हल्लेखोर तीन ते चार असावेत, असा संशय आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. खून झाल्याचे वृत्त समजताच बुधगाव व कवलापूरमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी मृत जाधव याची चप्पल, रक्ताने माखलेला स्टिलचा तांब्या, बांधकामात लांबी, रुंदी मोजण्यासाठी वापरण्यात येणारा टेप, मार्किंगचा खडू पडलेला होता. बुधगावातील ग्रामस्थ घटनास्थळी आल्याने जाधव यांची ओळख पटली.

जाधव हे बुधगावातील बनशंकरी मंदिराजवळ राहत होते. ते गवंडीकाम करीत होते. सोमवारी सकाळी ते कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी गेलेच नाहीत. सायंकाळी मैदानावर काही तरुण व्यायाम करण्यासाठी येतात. त्यांना जाधव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप शिंदे, उपनिरीक्षक सागर पाटील, हवालदार रमेश कोळी, सचिन मोरे, कपिल साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील बिरोबा नरळे, सागर लवटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन तिथेच घुटमळले. जाधव यांची एक चप्पल मृतदेहापासून पाच फूट अंतरावर तर दुसरी चप्पल पन्नास फूट अंतरावर पडली होती. यावरून त्यांचा थरारक पाठलाग करून खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. स्टिलचा एक तांब्याही सापडला. हा तांब्या पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. बोलावून घेऊन जाधव यांची ‘गेम’ केली असण्याची शक्यता आहे. त्यांचा मोबाईलही गायब आहे. मृताचे नातेवाईक आक्रोश करीत घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पंधरा ते सोळा वार : डोक्याचा चेंदामेंदा

जाधव यांच्या डोक्यावर पुढे-मागे, मानेवर, हनवटीवर व गळ्यावर असे पंधरा ते सोळा वार करण्यात आले आहेत. डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. शर्ट व बनियान रक्ताने माखलेला होता. काटेरी झुडूपाजवळ गवतामध्ये मृतदेह पडला होता. तिथेही मोठ्या प्रमाणात रक्त पडले होते. रात्री उशिरा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेहाची विच्छेदन तपासणी झाली.

Back to top button