सांगली : प्लॉट, जमिनी सोन्याच्या खाणी!

सांगली : प्लॉट, जमिनी सोन्याच्या खाणी!
Published on
Updated on

सांगली;  विवेक दाभोळे :  सातत्याने विविध बोगस कंपन्या, बनावट आर्थिक कंपन्यांतून राजरोस कोट्यवधीचा गंडा घातला जात आहे. यातून आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्लॉट, जमिनीत पैशाची गुंतवणूक करण्याकडे पैसेवाल्यांचा कल वाढू लागला आहे. अर्थात गुंवणुकीच्या या बदललेल्या 'ट्रेंड'ने खरोखरच ज्यांना घरासाठी जागा घ्यायची आहे त्यांची मात्र महागड्या प्लॉटच्या दराने कोंडी होत आहे. मात्र, स्थावर मालमत्ताही गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून पुढे आला आहे, हे नाकारता येत नाही.

गेल्या काही महिन्यांपासून जादा परतावा देणे तसेच शेअर मार्केट, अन्य ठिकाणी गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणि भरघोस परतावा मिळवून देण्यार्‍या बोगस आणि बनावट कंपन्यांचे पेव फुटले आहे. अगदी सांगली शहरातच शेअर मार्केटच्या नावाखाली कार्यालय सुरू करून सामान्यांची खुलेआम आर्थिक लूट होत आहे. गेल्या महिनाभरातच जवळपास कोट्यवधी रुपयांची अनेकांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यात काही डॉक्टर, वकील, करसल्लागार यांचाही समावेश आहे. जादा परताव्याच्या आशेने अनेकांनी तर कर्जे काढून गुंतवणूक केली आहे. मात्र, या कंपन्यांकडून आता हात वर केले जात आहेत. अर्थात ही अलीकडील गोष्ट झाली. खरेतर गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी हातातील पैसे गुंतविण्यासाठी जमिनी, प्लॉटमध्येच गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. यातूनच आता प्लॉट, शेतजमिनींचे भाव कडाडले आहेत.

दुनिया झुकती है… झुकानेवाला…

खरेतर जादा परतावा तो देखील कमी कालावधीत कसा काय शक्य होऊ शकतो असा विचार न करताच पैसा जादा मिळतो, म्हणून या कंपन्यांमध्ये भलीमोठी गुंतवणूक करणार्‍यांची संख्या कमी वाढतच आहे. या मानसिकतेचाच फायदा उठवून आर्थिक ठकसेन अशा योजनांतून अनेकांना राजरोस गंडा घालत आहेत. अर्थात यातून धडा घेत अनेकांनी आता प्लॉट, फ्लॅट खरेदी करून त्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. खरेतर फसवणुकीच्या योजना मुख्यत्वे करून चुकीच्या मार्गाचा अवलंब करून राबवल्या जातात. यात गुंतवणूकदाराला छोट्या जोखमीच्या मोबदल्यात मोठ्या पैशाचे आमिष दाखवले जाते. अशा योजना जुन्या म्हणण्यापेक्षा सर्वप्रथम जो गुंतवतो अशांसाठी, एकतर त्यांच्याच पैशातून अथवा त्यानंतर येणार्‍या गुंतवणूकदारांकडून पैसा उभा करत असतात. वास्तविक नफा काहीच कमविला जात नाही. या योजनांनी दाखविलेले फायदे, नफा हे केवळ या योजनांमधील येणारा पैसा सतत वाढत राहिला पाहिजे, जेणे करून योजना सुरू राहील याच केवळ उद्देशाने दाखविलेला असतो. मात्र, याचा फटका हा सामान्य गुंतवणूकदारांनाच बसला आहे. यामुळेच आता जमिनी, प्लॉटमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट होते.

गुंतवणुकीचा नवा पर्याय

बाजारातील चढउतार, अनेक आर्थिक कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना घातला जाणारा गंडा, आणि त्यामुळे वाढलेली जोखीम यामुळे आता अनेकांची मानसिकता ही दोलायमान झाली आहे.तर यातूनच जमिनीतील गुंतवणूक विश्वासाची वाटत आहे. अगदी गुंतवणुकीतील प्राधान्यक्रम पाहिले तरी देखील प्लॉट, जमिनीतील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जाते.
खरे तर काळानुरूप जमिनीची किंमत वाढत जाते, तर घराची किंमत कमी होत जाते. इमारतीचे मूल्य ठरवताना बांधकामाचा दर्जा, देखभाल, बांधकाम योजना हे घटक महत्त्वाचे ठरतात. उत्पन्नाचा विचार करता रिकाम्या प्लॉटला जास्त किंमत येते. मागणी व पुरवठा यांचे योग्य गुणोत्तर साधल्यास प्लॉटवर उत्तम परतावा मिळू शकतो. घरांपेक्षा प्लॉटचा पुरवठा कमी असल्याने व मागणी अधिक असल्याने जमिनीतून जास्त फायदा मिळतो, असा विचार आता गुंतवणूकदार करत असल्याचे चित्र आहे.

नवीन संकल्पना…

अनेकवेळा अनेकांना गुंतवणूक करताना सर्व गोष्टी या 'रेडिमेड' हव्या असतात . यातूनच अनेक प्लॉट व्यावसायिकांनी 'रेडी टू बिल्ड' या संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. या रेडी टू बिल्ड प्लॉटमध्ये भावी काळाचा विचार करून, सार्वजनिक रस्ते व इतर सार्वजनिक गरजांसाठी पुरेशी जागा आधीच ठेवलेली असते. यातून अशा लेआऊटमधील प्लॉटला भविष्यात चांगली किंमत मिळण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे यात प्रत्येक प्लॉटपर्यंत प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरद्वारे वीज कनेक्शनची सुविधा तसेच नळकनेक्शन, ड्रेनेज अथवा सेप्टिक टँक, स्ट्रीटलाईट, अंतर्गत सुसज्ज रस्ते, अशा मूळ गरजा पूर्ण केलेल्या असतात. त्यामुळे मूळ गरजांसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. अशा जागांना देखील गुंतवणूकदार पसंती देऊ लागले आहे. अर्थात गुंतवणुकीचा 'ट्रेंड' बदलण्यास ठकसेनांकडून गुंतवणूकदारांना घातला जाणारा कोट्यवधीचा गंडा कारणीभूत ठरला आहे, हे कोणच नाकारू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news