सांगली : मिरजेतून चोरीस गेलेली 35 लाखांची दारू बार्शीत पकडली; एकास अटक

सांगली : मिरजेतून चोरीस गेलेली 35 लाखांची दारू बार्शीत पकडली; एकास अटक
Published on
Updated on

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मिरज शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे गोडाऊन फोडून चोरलेली 35 लाख 741 रुपयांची विदेशी दारू बार्शी येथे पोलिसांनी पकडली. ट्रकचालकाच्या मोबाईल लोकेशनवरून महात्मा गांधी चौक पोलिसांनी बार्शी पोलिसांच्या मदतीने अवघ्या 24 तासांत या चोरीचा छडा लावला. याप्रकरणी रामा शंकर काळे (वय 20, रा. कणेरवाडी, जि. उस्मानाबाद) याला बार्शी पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य पाचजण फरारी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे रवा, मैदा कारखान्यासमोर फ्लॉट नं. 96 व 97 मध्ये एम्पायर स्पिरीट इंडिया नावाचे विदेशी दारूचे गोडाऊन आहे. येथून जिल्हाभरातील वॉईन शॉपसाठी दारूची विक्री होते. गुरुवारी सायंकाळी सहानंतरसंबंधित गोडाऊन बंद करण्यातआले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोडाऊनची भिंत फोडून गोडाऊनमधील सिग्राम कंपनीच्या व्हिस्की दारूचे 348 बॉक्स असा35 लाख 741 रुपयांचा दारुसाठा चोरुन नेला होता.

शुक्रवारी सकाळी गोडाऊन उघडण्यासाठी व्यवस्थापक विजय किसन निकम (वय 44, रा. अभिमान ऍसेट, विश्रामबाग)
आले असता त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी तातडीने महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली.दाखल झालेल्या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तातडीने हालचाली करीत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये संशयित ट्रकचा नंबर पोलिसांना मिळाला. या नंबरवरुन मुळ मालकाचा शोध घेण्यात आला. त्याच्याकडून मिळालेल्या मोबाईल नंबरचे ट्रेसिंग केले असता बार्शी येथील लोकेशन महात्मा गांधी चौकपोलिसांना मिळाले.

मोबाईलनंबरवरुन लोकेशन पडताळल्यानंतर संबंधित ट्रक बार्शी येथे असल्याचे आढळून आले. त्यानंतर याबाबत बार्शी पोलिसांना तातडीने माहिती देऊन महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रवीराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्यासह महात्मा गांधी चौक व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तातडीने बार्शीकडे रवाना झाले होते.

या दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 वाजता बार्शी पोलिस पेट्रोलिंग करीत असताना सहाजण एक ट्रक घेऊन संशयास्पदरित्या शहराबाहेर थांबले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता यातील संशयित बिभीषण काळे, पल्या काळे, अमोल काळे, चंदर काळे आणि सुभाष काळे या पाच जणांनी पलायन केले. तर रामा काळे हा मात्र बार्शी पोलिसांच्या तावडीत सापडला. रामा काळे याच्याकडे चौकशी करून ट्रकची तपासणी केल्यानंतर दारुचे बॉक्स मिळून आले. बार्शी पोलिसांनी सदर ट्रक मधील 35 लाख 741 रुपयांचा दारु साठा आणि 9 लाखांचा ट्रक असा 44 लाख 741 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन रामा काळे याला अटक केली.

या गुन्ह्यातील अटकेत असणारा रामा काळे याला बार्शी पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बार्शी येथे पकडलेली 35 लाखांची दारू बार्शी पोलिसांनी महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. रामा काळे याची बार्शी पोलिसांची कोठडी संपल्यानंतर त्याला महात्मा गांधी चौक पोलिस ताब्यात घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news