सांगली : मिरजेतील गोडाऊन फोडून चोरलेली ३५ लाखाची दारू पोलिसांनी बार्शीत पकडली | पुढारी

सांगली : मिरजेतील गोडाऊन फोडून चोरलेली ३५ लाखाची दारू पोलिसांनी बार्शीत पकडली

मिरज, पुढारी वृत्तसेवा : मिरज शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे गोडाऊन फोडून चोरलेली ३५ लाख ७४१ रुपयांची दारु बार्शी पोलिसांनी पकडली. ट्रक चालकाच्या लोकेशन वरून महात्मा गांधी चौक पोलिसांनी बार्शी पोलिसांच्या मदतीने अवघ्या २४ तासात या चोरीचा छडा लावला. या प्रकरणी रामा शंकर काळे (वय २०, रा. कनेरवाडी) याला बार्शी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर अन्य पाच जण फरार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे रवा मैदा कारखान्यासमोर एम्पायर स्पिरीट इंडिया नावाचे विदेशी दारुचे गोडाऊन आहे. येथून जिल्हाभरातील वॉईन शॉपसाठी दारुची विक्री होते. गुरूवारी सायंकाळी सहानंतर सदर गोडावून बंद करण्यात आले होते. त्या नंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सदर गोडाऊनची भिंत फोडून गोडावूनमधील दारुचे ३४८ बॉक्स असा ३५ लाख ७४१ रुपयांचा दारुसाठा चोरुन नेला होता.

शुक्रवारी सकाळी गोडाऊन उघडण्यासाठी आले असता गोडावून व्यवस्थापक विजय किसन निकम यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी तातडीने महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तातडीने हालचाली करीत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये संशयीत ट्रकचा नंबर पोलिसांना मिळाला. या नंबरवरुन मुळ मालकाचा शोध घेण्यात आला. त्याच्याकडून मिळाल्या मोबाईल नंबरचे ट्रेसिंग केले असता बार्शी येथील लोकेशन महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाले. त्यानंतर याबाबत बार्शी पोलिसांना तातडीने माहिती देऊन महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रवीराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्यासह महात्मा गांधी चौक व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तातडीने बार्शीकडे रवाना झाले होते.

या दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 वाजता बार्शी पोलिस पेट्रोलिंग करीत असताना सहा जण एक ट्रक घेऊन संशयास्पदरित्या शहाराबाहेर थांबले आल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता यातील संशयित बीभीषण काळे, पल्या काळे, अमोल काळे, चंदर काळे आणि सुभाष काळे या पाच जणांनी पलायन केले. तर रामा काळे हा मात्र बार्शी पोलिसांच्या तावडीत सापडला. रामा काळे याच्याकडे चौकशी करून ट्रकची तपासणी केल्यानंतर दारुचे बॉक्स मिळून आले. बार्शी पोलिसांनी सदर ट्रकमधील दारुसाठा जप्त करुन रामा काळे याला अटक केली. या गुन्ह्यातील अटकेत असणारा रामा काळे याला बार्शी पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचलंत का?

Back to top button