तासगाव : नियम बाजूला ठेवला; पूल पाण्यात गेला | पुढारी

तासगाव : नियम बाजूला ठेवला; पूल पाण्यात गेला

तासगाव; पुढारी वृत्तसेवा :  नियम मोडून ओढ्यामध्ये केलेल्या पुलावरून अवघ्या वर्षभरातच पाणी गेल्याने पालिकेचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. तासगाव शहरातील एका प्रॉपर्टी विक्रेत्याने कमी पैशात चांगली जागा देण्याची आमिष दाखवून अनेकांच्या गळी पडीक जागा उतरवली.

प्रत्यक्षात या जागेला रस्ताच नसल्याने अवघ्या तीन ते चार लाखात ही जागा अनेकांनी विकत घेतली. दरम्यान, पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित वायकोस व त्यानंतर गणेश शिंदे यांनी नियमांची मोडतोड करून कापूर ओढ्यामध्ये पुलाला परवानगी दिली. यावेळी दै. ‘पुढारी’ ने यावर सातत्याने बातम्या लिहून हा प्रकार जनतेच्या समोर आणून दिला होता. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे हा पूल पाण्याखाली गेला. यामुळे नियमबाह्य काम केलेल्या मुख्याधिकारी यांच्यामुळे तासगाव पालिकेतील बेकायदा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विकासाच्या नावावर 78 लाखदेखील पाण्यात

दरम्यान, तासगाव पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी विकासाच्या नावावर ओढ्यामध्ये अतिक्रमण केले. शहरातील महात्मा गांधी उद्यानातील खेळणी काढून ती चक्क ओढ्यामध्ये बसवली. तब्बल 78 लाख रुपये खर्च करून ओढ्यामध्ये पेव्हिंग ब्लॉक घालण्याचा प्रकारही पालिकेने केला. दर पावसाळ्यात हे सर्व पाण्याखाली जात असून या ठिकाणच्या वस्तूदेखील पाण्यामुळे गंजू लागल्या आहेत.

Back to top button