मिरज : टेम्पोने ठोकरल्याने पती ठार, पत्नी गंभीर | पुढारी

मिरज : टेम्पोने ठोकरल्याने पती ठार, पत्नी गंभीर

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मिरज-सांगली रस्त्यावर दूध वाहतूक टेम्पोने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील रायगोंडा बेळंकी (वय 65, रा. सुभाषनगर, मिरज) हे ठार झाले. तर त्यांच्या पत्नी सुशीला बेळंकी (वय 58) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रायगोंडा बेळंकी व त्यांच्या पत्नी सुशीला बेळंकी हे दोघे (एम.एच .10 बी 2780) या मोटरसायकलवरुन सांगली रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी निघाले होते. ते रस्ता क्रॉस करून जात असताना सांगलीहून मिरजेकडे भरधाव वेगाने येणार्‍या (एम.एच. 10 सीआर 3097) या दूध वाहतूक करणार्‍या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, मोटरसायकल टेम्पोखाली अडकून त्यांना फरफटत नेण्यात आले. यामध्ये पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान रायगोंडा बेळंकी यांचा मृत्यू झाला. तर सुशीला या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघातप्रकरणी दूध वाहतूक करणार्‍या टेम्पो चालकाविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button