सांगली : सेक्स्टॉर्शनचे कनेक्शन उत्तर भारतात

सांगली : सेक्स्टॉर्शनचे कनेक्शन उत्तर भारतात
Published on
Updated on

सांगली; स्वप्निल पाटील : सेक्स्टॉर्शनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला अनेक उच्चभू्र तरुणांपासून ते गरीब घरातील तरुणदेखील बळी पडत आहेत. रेकॉर्ड केलेली व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देवून हजारो रुपये उकळण्याचा फंडा उत्तर भारतातील काहीजणांनी सुरू केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक तरुण अडकले आहे. मात्र, पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

सेक्स्टॉर्शन म्हणजे एक प्रकारचा हनी ट्रॅप होय. अनोळखी नंबरवरून येणार्‍या व्हिडीओ कॉलला समोरचा भुलतो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो. पण हे खरे नसते. उत्तर भारतातील काही रिकामटेकड्या तरुणांनी सुरू केलेला हा नवीनच फंडा आहे. यातील माहितीनुसार एका तरुणीचे आक्षेपार्ह स्थितीत व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवलेले असतात. व्हॉट्सअ‍ॅप कॉल करायचा आणि त्या तरुणीचा व्हिडीओ दाखवायचा. व्हिडीओ कॉल सुरू असताना समोरच्याला काही घटना करण्यास भाग पाडून त्याचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येते. सदरचे रेकॉर्डिंग फेसबुक, यू – ट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात येते. तसेच ते डिलीट करायचे असेल तर त्यासाठी पैशाची मागणी करण्यात येते. पैसे न दिल्यास दिल्ली सायबर क्राईम, गुजरात सायबर क्राईममधून बोलतोय असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. असे अनेक प्रकार होत आहे.

खरे तर हा सर्व खटाटोप त्या रिकामटेकड्या तरुणांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात दोनतीन दिवस पैसे मागायचे प्रतिसाद दिला तर ठीक नाहीतर दुसरे 'सावज' शोधण्याचा या तरुणांचा रोजचा कार्यक्रम असतो. परंतु यामध्ये आपल्याकडील अनेक तरूण मात्र फसत आहेत. यात एखाद्या कामगारापासून ते उच्चभू्र तरुणांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. मात्र आपली बदनामी टाळण्यासाठी कोणीही याच्या विरोधात आवाज उठवत नाही आणि अशा घटनांना बळी पडतात. परंतु त्यांना पैसे दिले नाहीतर आपली बदनामी होईल अशी अनेकांच्या मनात शंका असते. वास्तविक पाहता हा उद्योग करणारी एक टीम असते. व्हिडीओ कॉल करणारा, पोलिस आहे म्हणून सांगणारा हे सर्व याच टीमचे सदस्य असतात. त्यामुळे पैसे दिले नाहीतर यातून बदनामी होईल, असे मुळीच नाही. त्यामुळे अशा घटना घडल्यास तरुणांनी तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेण्याची गरज आहे.

बोगस नंबर, बोगस बँक अकाउंट

ज्या मोबाईल नंबरवरून हा सर्व खटाटोप करण्यात येतो. तो नंबरच मुळात बोगस असतो. अज्ञात व्यक्तीचे आधारकार्ड किंवा अन्य कागदपत्रांचा वापर करून काहीजणांना 'मॅनेज'करून नंबर मिळविला जातो आणि त्या नंबरवरून हा सर्व प्रकार केला जातो. एखादे सावज जाळ्यात अडकल्यानंतर तो नंबर मात्र कायमस्वरूपी बंद केला जातो.

उत्तर भारतीय तरुणांचा समावेश

याबाबत काही गुन्हे दाखल झाल्यानंतर सांगली सायबर सेलने याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. हे नंबर दिल्ली, नोएडा आणि एनसीआर
भागातील असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी धाड देखील टाकली. परंतु ज्या व्यक्तीच्या नावावर तो नंबर होतो. त्याचा त्याला सुगावा देखील नव्हता.

महिन्यात दहा ते पंधरा घटना

महिन्याकाठी जिल्ह्यातील दहा ते पंधरा जण अशा घटनांचे 'शिकार' होत असल्याचे आढळून येते. अर्थात हे पोलिसांत येणारे आकडे आहेत. पोलिसांत न येणारे आकडे वेगळेच आहेत. बदनामीला घाबरून अनेकजण पोलिसांत जात देखील नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news