सांगली : आटपाडी तालुक्यातील चोरीप्रकरणी दोघांना अटक
आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. त्यापैकी एकाचा जून महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील 40 लाखांच्या दरोड्यात सहभाग होता.स्वप्निल दगडू हजारे (वय 20) आणि प्रथमेश मुकुंद शिंदे (19, दोघेही रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. या दोन आरोपींकडून दोन मोटारसायकली आणि 54 ग्रॅम सोने असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारीपद्मा कदम आणि पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
पोलिस निरीक्षक मेमाणे यांना खास बातमीदाराकडून दिघंची बसस्थानक परिसरात विना नंबरप्लेटच्या मोटारसायकल वरून दोघेजण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवाउडवीची दिल्यानंतर या दोघांनी 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता दिघंची ते खवासपूर रस्त्यावर चालत जाणार्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा देऊन काढून घेत मोटारसायकलीवरून पलायन केले असल्याची कबुली दिली. तसेच 20 मार्च रोजी सकाळी 8.45 वाजता घरनिंकी येथील ओढ्यात 70 वर्षांच्या वृद्धाला थांबवून त्याच्या मोटारसायकलची किल्ली घेऊन त्याच्या गळ्यातील चार तोळ्यांची चेन हिसडा मारून घेत मोटारसायकली वरून पळ काढल्याची कबुली दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळला 5 जून रोजी पाच जणांनी दरोडा टाकला आणि 40 लाखांची रोकड लंपास केली होती.दरोड्यातील तीन आरोपी सापडले असून दोन फरारी होते. प्रथमेश शिंदे हा देखील या दरोड्यात सहभागी होता, असे स्पष्ट झाले आहे. त्यांनी तशी कबुली दिली आहे.
पोलीस निरीक्षक मेमाणे, उपनिरीक्षक अजित पाटील, हेड कॉन्स्टेबल शैलेश कोरवी, पाटील, पोलीस नाईक अमोल कराळे, नितीन मोरे, कॉन्स्टेबल संभाजी सोनवणे, ढाले, लोंढे यांनी ही कारवाई केली.आज दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.