सांगली : बँकेची 17 कोटी रुपयांची फसवणूक; कंपनीच्या माजी व्यवस्थापकाला अटक | पुढारी

सांगली : बँकेची 17 कोटी रुपयांची फसवणूक; कंपनीच्या माजी व्यवस्थापकाला अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी दिलेला माल मिरज येथील बँक ऑफ बडोदा शाखेत तारण ठेवला. त्यानंतर त्या मालाची परस्पर विक्री करून बँकेची 16 कोटी 97 लाख रुपये फसवणूक केल्याप्रकरणी मोडीटी नेक्स्ट कार्पोरेशन लि. मुंबई या कंपनीचा माजी एरिया व्यवस्थापक अजित नारायण जाधव याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई झाली. त्याला न्यायालयाने पाच सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

पोलिसांनी सांगितले की, जाधव हा दोन वर्षांपूर्वी कंपनीचा एरिया मॅनेजर होता. त्याने मिरज तालुक्यातील 46 शेतकर्‍यांकडून शेतमाल घेऊन ठेवला होता. तो माल त्याने बँक ऑफ बडोदा बँकेत तारण ठेवून त्याची परस्पर विक्री केली. ही घटना मार्च 2017 ते नोव्हेंबर 2020 मध्ये घडली. फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेतकर्‍यांच्या नावे काढलेले कर्ज थकीत ठेवून बँकेबरोबर केलेल्या कराराचा भंग करून बँकेची 16 कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. जाधव यास मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Back to top button