सांगली : तासगाव, जतच्या दोन टोळ्या तडीपार | पुढारी

सांगली : तासगाव, जतच्या दोन टोळ्या तडीपार

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  तासगाव आणि जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांना जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी तडीपार कारवाईचा दणका दिला. दोन टोळ्यांमधील सहा गुन्हेगारांना सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

तासगाव हद्दीतील प्रमोद रामचंद्र उगारे (वय 25), बाबू उर्फ प्रमोद वसंत माने उर्फ गरड (30) व विशाल उर्फ कृष्णा सिद्धू उणउणे (22, तिघे रा. सावळज) या तिघांना तडीपार केले आहे. उगारे हा टोळीप्रमुख आहे. 2014 पासून ही टोळी गुन्हेगारीत सक्रिय आहे. खुनाचा प्रयत्न, चोरून वाळूची तस्करी करणे, गर्दी मारामारी, दुखापत, हल्ला करणे, अतिक्रमण करणे असे गंभीर गुन्हे तासगाव, कवठेमहांकाळ व सांगोला पोलिस ठाण्यात नोंद आहेत.

जत हद्दीतील विकास अशोक बनपट्टी (26), आकाश अशोक बनपट्टी (25) व सागर अशोक बाथरूट (24, तिघे रा. विठ्ठलनगर, जत) यांना तडीपार केले आहे. विकास बनपट्टी हा टोळीप्रमुख आहे. त्यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, धारदार हत्याराने हल्ला करून जखमी करणे, शासकीय आदेशाचा अवमान करणे, शिवीगाळ व दमदाटी व मारहाण करणे असे 11 गंभीर गुन्हे जत पोलिस ठाण्यात नोंद आहेत. याशिवाय तीन अदखलपात्र गुन्हेही दाखल आहेत.

दोन्ही टोळ्यातील गुन्हेगारांना अनेकदा अटक करण्यात आली. पण तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध तडीपारीचा प्रस्ताव गेडाम यांच्यासमोर सादर केला होता. गेल्या काही दिवसांपासून या प्रस्तावावर सुनावणी सुरू होती. ती आज पूर्ण झाली.

Back to top button