मिरज : फासातून कुत्रा निसटला अन् कर्मचार्‍यालाच चावला | पुढारी

मिरज : फासातून कुत्रा निसटला अन् कर्मचार्‍यालाच चावला

मिरज; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर कुत्र्यांची झुंड दिसताच त्यांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी फासा टाकला. परंतु फासातून निसटलेल्या भटक्या कुत्र्याने थेट महापालिकेच्या कर्मचार्‍याचाच चावा घेवून त्याला जखमी केले. विनायक अण्णाजी कांबळे (वय 38) असे त्या कर्मचार्‍याचे नाव असून मिरजेत बुधवारी ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भटकी कुत्री पकडणारे महापालिकेचे पथक व्हॅन घेवून भारतनगर येथे आले.

त्यावेळी पथकाला भटक्या कुत्र्यांची एक टोळी दिसली. त्यामुळे पथकातील विनायक कांबळे हे कुत्र्यांना पकडण्यासाठी फासा घेवून कुत्र्यांजवळ गेले. त्यांनी एक कुत्रा पकडण्यासाठी फासा टाकला. परंतु तो फासा त्या कुत्र्याच्या गळ्यात अडकण्याऐवजी त्याच्या पोटाजवळ अडकला.

जोरात हिसडा मारुन त्या कुत्र्याने फाशातून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर मागे फिरून थेट विनायक कांबळे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मांडीचा चावा घेतला अन् त्या कुत्र्याने पलायन केले. कुत्र्याच्या हल्ल्यात मनपा कर्मचारी कांबळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यासोबत असणार्‍या अन्य कर्मचार्‍यांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Back to top button