पुढारी वॉच : रस्त्यात खड्डा! सांगली शहरासह जिल्ह्यातील दयनीय अवस्था | पुढारी

पुढारी वॉच : रस्त्यात खड्डा! सांगली शहरासह जिल्ह्यातील दयनीय अवस्था

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली शहरासह जिल्ह्यातील एखादाच अपवाद सोडला तर बहुतेक सर्वच रस्त्यांच्या खड्डे पडून चिंध्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कमालीची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, हे चित्र आता सार्‍यांच्याच अंगवळणी पडले आहे. तर यामुळे लहान-मोठ्या दुर्घंटनांना विनासायास आमंत्रण मिळू लागले आहे. मात्र सर्वच ठिकाणी शासनाचा संबंधित विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. ही डोळेझाकपणाची भूमिका सोडून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, खड्डेमुक्‍तरस्ते ही मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. जिल्हाभरातील या सर्व चित्राचा घेतलेला हा प्रातिनिधीक आढावा…!

इस्लामपूर रस्ता बनला खड्ड्यांचा मार्ग

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून सांगली-इस्लामपूर रस्ता आणि खड्डे असे समीकरणच बनले आहे. आजपर्यंत रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. मात्र लक्ष्मी फाट्यापासून ते तुंगपर्यंत रस्त्याची अवस्था बिकट आहे. या मार्गावरून जाणार्‍या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींकडून मात्र वेळोवेळी केवळ आश्‍वासनाची खैरातच मिळत असल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

डिसेंबर 2017 मध्ये हा रस्ता केंद्राकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. सन 2018 मध्ये पेठ – सांगली या रस्त्याच्या कामासाठी 12 कोटीची निविदा काढण्यात आली होती. तीन टप्प्यांत त्याचे काम करण्यात आले. सन 2019 मध्ये पुन्हा पूरग्रस्त निधीतून डिग्रज फाटा ते टिळक चौक रस्त्यासाठी 10 कोटी मंजूर करण्यात आले होते. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. तीन ते चार वर्षात रस्ता दुरुस्तीसाठी 22 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अधूनमधून पॅचर्वकसाठी झालेला निधीचा खर्च हा वेगळाच विषय. आजपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याची अवस्था शेतातील पाणंद रस्त्यासारखीच आहे. पैसे खर्च होतात, मग रस्ता का होत नाही हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. तशी प्रतिक्रिया उमटत आहे.

शिराळा तालुक्यात रस्त्यांची चाळण

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे रस्ते उखडले आहेत. वाहनधारकांतून संतापाची लाट उसळली आहे. टक्केवारीमुळे रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

राज्य महामार्ग क्रमांक 111

पेठ नाका ते शिराळा रोड रेठरे धरण पर्यंत उखडला आहे. शिराळा येथील बसस्थानकापासून ते कोकरूड नाका येथे सहा महिने झाले नवीन काँक्रिटीकरण करून रस्ता केला आहे. त्यावरील सिमेंट निघून गेले आहे.

सुजयनगरला पूल पडलेल्या रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. एक वर्ष वाहतूक बंद आहे. प्रशासन लक्ष देत नाही. शिराळा-पाडळी रस्त्यावर अंबामाता मंदिर परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. कापरी रोडवर खड्डे पडले आहेत. सुरले वस्तीवरून मांगले रस्ता ओढ्याजवळ खराब झाला आहे.

शेडगेवाडी ते चांदोली रस्ता पूर्ण पणे खराब झाला आहे. तर काळुंदे फाटा ते चिंचेवाडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आरळा-चांदोली जाणार्‍या मुख्य रस्त्याची तर चाळण झाली आहे. वाहनधारक व प्रवाशांतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिरजेतील सर्व रस्ते खराब

मिरज : मिरज शहरासह ग्रामीण भागातील सर्व रस्ते हे खराब झाले आहेत. मिरज शहरात येणारे व शहरातून बाहेर जाणारेही रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मिरज शहराला बायपास रस्ते नाहीत. त्यामुळे मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरूनच वाहनांना ये – जा करावी लागते. आता राष्ट्रीय महामार्गामुळे अंकली ते तानंग रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा खराब झाल्याने त्याचे काम सुरू आहे. मात्र ते काम चांगल्या पद्धतीचे होईल का? याची शंका नागरिकांना वाटत आहे. वंटमुरे कॉर्नर कडून बसस्थानकाकडे जाणारा व परमशेट्टी हॉस्पिटलकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. सर्वच रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत.

मिरज ग्रामीण भागात रस्ते खराब झाले आहेत. मिरजेतून बेडग व म्हैसाळ या दोन गावांमधून कर्नाटकला दोन रस्ते जोडले जातात. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या मार्गावर वड्डीजवळही खड्डे पडले आहेत. वड्डी व विजयनगरजवळ खड्डे पडले आहेत. नरवाडपासून बेडगकडे जाणारा रस्ता खराब आहे. मिरज ते आरग हा रस्ता खराब आहे. बेडग ते आरग, बेडग ते मंगसुळी रस्ता खराब आहे. हा रस्ता 2016 मध्ये करण्यात आला होता. तो नंतर थोड्या अंतरापर्यंत करण्यात आला. आता खराब झाला आहे. तो पुन्हा करण्यात आला नाही. बेडग ते मल्लेवाडी हा रस्ता खराब आहे. बेडग ते एरंडोली हा रस्ताही खराब झाला आहे. बेडग ते विजयनगर हा रस्ता खराब आहे.

पलूस तालुक्यात रस्ते धोकादायक

पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रवाशांना फटका बसत आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणार्‍यांवर मणक्यांच्या दुखापतींचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. दुधोंडी – घोगाव रस्ता, बुर्ली – आमणापूर रस्ता, किर्लोस्कवाडी – बुर्ली रस्ता, मोराळे – पलूस रस्ता, मोराळे – बांबवडे रस्ता, ब्रह्मनाळ – भिलवडी स्टेशन रस्ता, चोपडेवाडी – कदमवस्ती रस्ता, खंडोबाचीवाडी ते पाचवा मैल रस्ता, पलूस शहरातील शिवशक्ती चौक ते फॅशन कॉर्नर, गांधी चौक ते कासारवाडा, गंजीखाना ते श्री कॉलनी ते मुस्लिम दफनभूमी, वसंतरावजी पुदाले (दादा) मार्ग ते हुतात्मा स्मारक, विकास कारखाना रोड, बाबा हवेली ते नवीन बस स्टॅण्ड, जुने बस स्टॅण्ड रोड या सार्‍याच मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत.

मोराळे – बांबवडे हा रस्ता पूर्ण कामाच्या प्रतीक्षेत आहे. ब्रह्मनाळ ते भिलवडी स्टेशन व चोपडेवाडी ते कदमवस्ती रस्त्यावर गेल्या चार वर्षात जागोजागी खड्डे मुजवणे एवढेच काम चालू आहे. दुधोंडी ते घोगाव हा रस्तादेखील जागोजागी उखडला आहे.

कवठे महांकाळमध्ये रस्त्यांची एकच दुरवस्था

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांतील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असे चित्र आहे. शहरातील विद्यानगर परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील विद्यानगर परिसरातील मुख्य रस्ते खराब झाले आहेत.पावसाळ्यात पाणी साचल्याने रस्ता चिखलमय बनला होता.
नांगोळे – लंगरपेठ – ढालेवाडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आगळगाव फाटा – आरेवाडी, आरेवाडी – इरळी या रस्त्यासह तालुक्याच्या पूर्वभागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

पश्चिम विभागातील लोणारवाडी ते अग्रण धुळगाव, हरोली – खरशिंग फाटा रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तालुक्यात काही प्रमुख गावांतील रस्त्यांची ही दुरवस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे.

कडेगाव तालुक्यात खड्डे धोकादायक

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कडेगाव शहर तसेच अन्य गावांना जोडले जाणार्‍या ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहेे.

तालुक्यात विजापूर – कडेगाव – गुहागर राष्ट्रीय महामार्गासह मल्हारपेठ – पंढरपूर, पुसेसावळी – कडेपूर – वांगी हे प्रमुख राज्य मार्ग आहेत. तसेच कडेगाव – निमसोड, तडसर, शिरसगाव, देवराष्ट्रे याचबरोबर देवराष्ट्रे-वांगी, देवराष्ट्रे – शिरसगाव, आसद – पाडळी, चिंचणी – वाजेगाव आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या ग्रामीण रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक रस्ते पावसामुळे उखडले आहेत. यामुळे येथे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या भागात अनेक किरकोळ स्वरूपातील अपघात होत आहेत.
तालुक्यातील मल्हारपेठ – पंढरपूर, पुसेसावळी – कडेपूर- वांगी हे प्रमुख राज्य मार्ग तसेच कडेगाव – तडसर, कडेगाव – सोहोली – तोंडोली, कडेगाव – देवराष्ट्रे – चिंचणी, कडेगाव – शाळगाव या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली. रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने वाहने चालवताना खड्डे चुकवा आणि बक्षीस मिळावा, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

हे सर्वच रस्ते संबंधित खात्याने त्वरित लक्ष देऊन दुरुस्त करावेत, राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीला सोयीचे करावेत, अशी मागणी वाहनधारकांतून व जनतेतून होत आहे.

दर्जा राष्ट्रीय, काम राज्यमार्गाचे : तालुक्यातून विजापूर – कडेगाव – गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दर्जा राष्ट्रीय महामार्गाचा व काम राज्यमार्गाचे अशी अवस्था इथे दिसून येते. निकृष्ट कामामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ताही उखडलेला आहे. या महामार्गाच्या मनमानी कामाची चौकशी व्हावी यासाठी अनेक वेळा निवेदने व आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र कोणी दखल घेत नसल्याचे चित्र आहे.

Back to top button