
नेवरी; पुढारी वृत्तसेवा : कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वेफर्स बटाटा खरेदी करणार्या काही एजंटांनी गतवर्षी खरेदी केलेल्या बटाटा मालाचे अद्याप पैसे दिलेले नाहीत. तसेच काहींचे धनादेश बँकेत वठले नाहीत. यातून या शेतकर्यांना आर्थिक गंडा घातला आहे. या एजंटांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये उसाला पर्याय म्हणून वेफर्स साठी बटाटा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कमी दिवसांमध्ये आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे हे हुकमी पीक आहे. यातून परिसरामध्ये बटाटा शेती वाढत आहे. तर चांगली कमाई असल्यामुळे परिसरातीलच काहींनी बटाटा बियाणे देणे व उत्पादित बटाटा खरेदी करणे हा व्यवसाय चालू केला आहे. प्रत्येक वर्षी यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. यामध्ये अनेक एजंट मालामाल झाले आहेत. गतवर्षी नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये बटाट्यांचे सौदे झालेल्या काही शेतकर्यांना अद्याप या एजंटांनी बटाट्याची बिलेही दिली नाहीत. यामुळे याबाबत तक्रार करण्यासाठी शेतकर्यांना अडचणी येत आहेत.बटाटा लागवडीसाठी खर्चही अधिक होतो. खर्चासाठी शेतकर्यांनी बँकांची कर्जे घेतली आहेत. बँकांचा कर्जासाठी ससेमिरा चालू आहे. तर वेळेत बिले न मिळाल्यामुळे शेतीचे वेळापत्रक कोलमडले आहे. बिलासाठी एजंटाकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. यातून परिसरातील शेतकरीवर्ग पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे या एजंटांच्या कारनाम्याची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.