सांगली : आंतरजिल्हा बदल्याचे आदेश निघणार 24 रोजी | पुढारी

सांगली : आंतरजिल्हा बदल्याचे आदेश निघणार 24 रोजी

सांगली ः पुढारी वृत्तसेवा ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. राज्यातील आंतरजिल्हा बदल्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाला आहे. सोमवारी बदल्याच्या याद्या निश्‍चित होणार आहेत. तसेच बुधवार, दि. 24 रोजी बदल्याचे आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर कुठल्या शिक्षकांची कुठे बदली झाली हे स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातून यावर्षी बाहेर जाण्यासाठी तीन शिक्षकांनी ना हकरत प्रमाणपत्राची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. यातील दोघांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. केवळ एकाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच ना हरकत प्रमाणपत्रधारक शिक्षक संवर्ग 1 आणि संवर्ग 2 आणि सर्वसाधारण असे 92 जण जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी पात्र झाले आहेत. तसेच जिल्ह्यात येणार्‍या भूमिपुत्रांची संख्या मोठी आहे. मात्र शासनाकडून अद्यापही याबाबतची संख्या घोषित केलेली नाही. सध्या ही माहिती शासनाच्या संगणाकातच असल्याचे चित्र आहे. सोमवारी किंवा मंगळवारी मायभूमीत येणार्‍या शिक्षकांची संख्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

शिक्षक बदल्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप दरवेळी होत होता. यामुळे या प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षेखाली पाच लोकांची समिती नेमण्यात आलेली होती. या समितीने केलेल्या नवीन धोरणानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते सोमवारी बदल्याची माहिती खुली करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सोमवारी बदल्याचे बर्‍यापैकी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे प्रशासन देणार बदलीचा अंतिम निर्णय

जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 92 शिक्षक पात्र झाले आहेत. तसेच जिल्ह्यात येणार्‍या शिक्षकांची संख्या अद्यापही समोर आलेली नाही. शासनाकडून बुधवारी आंतरजिल्हा बदलीचे आदेश जिल्हा परिषदेकडे प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन जिल्ह्यात असणार्‍या शिक्षकांच्या रिक्त जागा, जिल्ह्यातून बाहेर आणि जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या विचारात घेऊन या बदलीवर अंतिम निर्णय घेणार आहेत.

अनेक वर्षांपासून स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी अनेक शिक्षकांची इच्छा होती. नुकतीच ऑनलाईन बदली प्रक्रिया झाल्याने यामध्ये पारदर्शकता आली. जिल्हातंर्गत प्रक्रियाही लवकरच सुरू होईल, अशी आशा आहे.
– अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना

Back to top button