टोलला नागरिकांचा विरोध ! टोलमुक्‍त कृती समितीची स्थापना : सोमवारी ठरणार आंदोलनाची दिशा | पुढारी

टोलला नागरिकांचा विरोध ! टोलमुक्‍त कृती समितीची स्थापना : सोमवारी ठरणार आंदोलनाची दिशा

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ तालुका टोलमुक्त व्हावा, या मागणीसाठी शिरढोण येथे आयोजित बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत टोलमुक्त कृती समिती स्थापन केली. समितीने सोमवार (दि.22) रोजी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देऊन त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा निर्णय घेतला.

शिरढोण (ता.कवठेमहांकाळ) येथे सर्वपक्षीय नेत्यांची कवठेमहांकाळ तालुका टोलमुक्तीच्या मागणीसाठी बैठक झाली. तालुक्यातील महामार्गावरील अनेक कामे अपूर्ण आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील नागरिकांना टोल आकारण्यात येऊ नये. तालुका टोलमुक्त व्हावा, अशी मागणी भाजपाचे हायुम सावनूरकर यांनी केली.

यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनी कवठेमहांकाळ तालुक्यासह वीस किलोमीटर परिसरातील नागरिकांचा टोल घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली. तसेच महामार्गावरील विठ्ठलवाडी, शेळकेवाडी, नरसिंहगाव, शिरढोण, खरशिंग फाटा येथील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करावीत. टोल नाक्यावरील नोकरभरतीत 80 टक्के स्थानिकांना नोकरी मिळावी, अशी मागणी केली. महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याचे सांगितले.

बैठकीला भानुदास पाटील, शंतनू सगरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही.पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती पवार, मनसेचे वैभव कुलकर्णी व धनंजय शिंदे, माजी सभापती एम. के. पाटील, शेकापचे दिगंबर कांबळे, दिलीप झुरे, आजम मकानदार, सिद्धार्थ माने, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव बोगार, सरपंच सुहास पाटील यांच्यासह प्रमुख गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

टोल नाक्यावर अपघात; पोलिस जखमी

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील टोलनाक्यावर टोलमुक्त कृती समिती जाणार असल्याची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे पोलिस फाट्यासह दाखल झाले. याचवेळी शनिवारी (दि.20) रोजी चारचाकी व दोनचाकी यांच्यात अपघात झाला.अपघातात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलिसांना तत्काळ कवठेमहांकाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

स्कूल बसना टोल नको..

शिरढोण येथे झालेल्या सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत स्कूल बसच्या टोलबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर समितीच्या पदाधिकार्‍यांनी बोरगाव येथील टोल नाक्यावर जात टोल व्यवस्थापकांना स्कूल बसला टोलनाका आकारण्यात येऊ नये, अशी मागणी केली.

वीस कि.मी. अंतरावरील वाहनधारकांना टोल माफ करा

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील टोलनाक्यावर वीस कि.मी. अंतरावरील नागरिकांना टोल माफ करावा, अशी मागणी कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन टोलनाका व्यवस्थापकांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बरीच कामे अपूर्ण असताना टोल सुरू करणे हे अन्यायकारक आहे. महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे काम अपूर्ण आहे. येथे अपघातात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. विठ्ठलवाडी, शिरढोण, शेळकेवाडी, खरशिंग फाटा येथील कामे अपूर्ण आहेत. महामार्गावरील कामे पूर्ण करावीत.

तसेच बोरगाव येथे टोलनाका सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांना नाहक अडचणी निर्माण होत आहेत. वीस किलोमीटर अंतरावरील गावांना नि:शुल्क पास मोफत द्यावा, अन्यथा राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.

निवेदनावर गणेश पाटील, शिवाजी कदम, दिग्विजय शिंदे, मन्सूर मुलाणी, सचिन कदम, आप्पासाहेब घोरपडे, शहाजी देसाई, अरविंद कोरे आदींच्या सह्या आहेत.

Back to top button