पाण्यावरून कळवळा, मग भाकरीवर जीएसटी का? | पुढारी

पाण्यावरून कळवळा, मग भाकरीवर जीएसटी का?

सांगली : पुढारी वृत्तसेवा पाणी कनेक्शन नसतानाही पाणीपट्टी आकारून दिलेली पाणीबिले अन्यायी आहेत. त्याला तीव्र विरोध आहे. प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा देत भाजपने महासभेत राष्ट्रवादी व काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर भाकरीवर जीएसटी लावणार्‍या भाजपचा पाण्यावरून सुरू असलेला कळवळा केवळ दिखावू, असल्याचा प्रहार काँग्रेसने भाजपवर केला. केंद्र सरकारने धान्य, दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लावला. महागाईत प्रचंड वाढ केली हा जनतेवर अन्याय नाही का, असा सवाल केला. राष्ट्रवादी व काँग्रेसनेही सरसकट पाणीपट्टी आकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. आज तांत्रिक अडचण असल्याने निर्णय न घेता सरसकट पाणीपट्टी रद्दसाठी लवकरच विशेष महासभा घेण्याची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली.
महापालिकेत गुरुवारी महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त सुनील पवार, नगरसचिव चंद्रकांत आडके तसेच पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

नळकनेक्शन नसतानाही सरसकट पाणीपट्टी आकारण्याच्या विरोधासंदर्भात विषय भाजपच्या नगरसेविका अनारकली कुरणे यांनी मांडली. राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते यांनीही हा विषय उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील सर्व 1 लाख 45 हजार मालमत्ताधारकांना घरपट्टी सोबत पाणीपट्टीचेही बिल दिले आहे. घरपट्टी व पाणी पट्टीच्या बिलाचे एकत्रिकरण करताना प्रसासनाने सरसकट पाणी बिल आकारल्याने ज्यांच्याकडे पाणी कनेक्शन नाही असे नागरिक, व्यापारी गाळे, खुले भूखंड, घोषित झोपडपट्टी, ग्रुप कनेक्शन यांनाही पाणी बिले आकारली आहेत. या विरोधात नागरिकांत रोष निर्माण झाला. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टीचे बिल एकत्रित न देता स्वतंत्रपणे द्यावीत. नळकनेक्शन नसलेल्यांना पाणी बिल देऊ नये, अशी मागणी केली. अभिजित भोसले, भारती दिगडे, स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, विनायक सिंहासने, अजिंक्य पाटील, गजानन आलदर, विजय घाडगे, संजय मेंढे, संगीता खोत, वहिदा नायकवडी, शेडजी मोहिते, विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, विष्णू माने, आनंदा देवमाने, प्रकाश मुळके व अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
संतोष पाटील म्हणाले, लोकांना रोज 20 रुपये देवून एक लिटर पाणी पिणे परवडे, मात्र 1 हजार लिटर पाण्यासाठी महापालिकेला 8 रुपये देणे परवडत नाही का? मोठे व्यापारी, मोठे व्यावसायिक यांच्या मालमत्तांना पाणीपट्टी लावण्यास काय हरकत आहे? कमर्शिअल काही मालमत्तांना अंशत:ही पाणी बिल आकारण्याबाबत चर्चा व्हावी.

मागील सभेतील ठराव रद्द करायचा झाल्यास तांत्रिक मुद्दे उपस्थित होतील. पूर्णत: ठराव रद्दऐवजी ठरावात दुरुस्ती अथवा विशेष सभा याबाबत प्रशासनाने भूमिका घ्यावी, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. त्यावर भाजपचे शेखर इनामदार यांनी आक्रमक होत सरसकट पाणीपट्टीला भाजपचा विरोध आहे. मदनभाऊ पाटील युवा मंचने अन्यायी पाणी बिल आकारणीला विरोध केला आहे. त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, पण सभागृहात वेगळी भूमिका का? भाजपचे दोन्ही आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी मागणी करूनही सरसकट पाणीपट्टीचा ठराव रद्द होत नसेल तर भाजपतर्फे आंदोलन करू, असा इशारा इनामदार यांनी दिला. त्यावर काँग्रेसचे गटनेते मेंढे हेही आक्रमक झाले. भाकरीवर जीएसटी लावणार्‍या भाजपला पाण्यावरून कळवळा कसा काय आला, असा प्रहार केला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांचा अन्यायी पाणी बिलांना विरोध आहे. ज्यांच्याकडे कनेक्शन नाही त्यांची बिल आकारणी करू नये, असे आमचे मत आहे. मात्र भाजपने यावर राजकारण करू नये. यावरून भाजप व काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. घोषणाबाजी झाली. सभेत प्रचंड गोंधळ झाला. महापौर सूर्यवंशी यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत केले.

प्रोसिंडिंगच्या चौकशीचे आदेश

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी ऑनलाईन, ऑफलाईन महासभेत अनेक विषयी ऐनवेळी आणत बेकायदेशीर ठराव केल्याचा आरोप विवेक कांबळे यांनी केला. तसे दोनशे ठराव असतील. कमी व जास्तही असतील, पण त्याची चौकशी करा, अशी मागणी कांबळे यांनी आयुक्तांकडे केली. त्यावर महापौर सूर्यवंशी आक्रमक झाले. मी महापौर झाल्यापासून झालेल्या सर्व विषयांची, प्रोसिडिंगची चौकशी करा. काही बेकायदा आढळले तर ते रद्द करा, असा आदेशच त्यांनी आयुक्तांना दिला.

मानधन कर्मचार्‍यांची कायमची मागणी

ठराविक मानधनी कर्मचार्‍यांनाच सेवत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा ठरावारूनही चर्चा झाली. नायकवडी यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. काही ठराविक कर्मचारीच का? हे कर्मचारी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या जवळचे असल्यानेे त्यांचा बेकायदेशीरपणे ठराव केल्याचा आरोपही शेखर इनामदार यांनी केला. अन्य सदस्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यावर महापौर सूर्यवंशी यांनी हा ठराव रद्द करत पुढील सभेत सर्वच मानधन कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात प्रस्ताव आणण्याची सूचना प्रशासनास केली.

सत्ता बदलली, चौकशी लावू : इनामदार

नगरसेवक शेखर इनामदार यांनी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली. आडके यांनी अनेक विषय बेकायदेशीर ऐनवेळी आणून ठरावात घुसडले असल्याचा आरोप केला. चौकशी सुरू असताना ते कामकाज कसे काय करत आहेत? त्यांनी निलंबित करा. आयुक्त सुनील पवार यांनी आजच त्यांच्याकडून प्रोसेडिंग ताब्यात घ्यावे. त्यांच्या कारभाराची चौकशी करावी. राज्यात सत्ता बदलली आहे, हे लक्षात ठेवा. इथे कारवाई न झाल्यास वरून चौकशी करून कारवाई करू, असा इशाराही इनामदार यांनी दिला.

हेही वाचा

Back to top button