मिरज, कुपवाडमध्ये एकी; सांगली एकाकी | पुढारी

मिरज, कुपवाडमध्ये एकी; सांगली एकाकी

सांगली : पुढारी वृत्तसेवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग (शंभर फुटी रस्ता) ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित करण्यासाठी 76 कोटींच्या विषयाला मान्यता देण्यावरून महासभेत प्रचंड गदारोळ झाला. मान्यतेसाठी सांगलीचे नगरसेवक विशेष आग्रही होते. तर केवळ एकाच शहरातील रस्त्यास मान्यता न देता सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांतील रस्त्यांचे विषयपत्र एकाचवेळी आणून मान्यता द्या, यावर मिरज आणि कुपवाडचे नगरसेवक एकवटले. सांगली विरुद्ध मिरज आणि कुपवाड असा सामना रंगला. महासभेत प्रचंड गदारोळ झाला. मिरज, कुपवाडच्या नगरसेवकांना राजर्षी शाहू मार्गाची मान्यता अडविण्यात यश आले.

राजर्षी शाहू महाराज मार्ग मॉडेल रस्ता म्हणून विकसित करण्याचा विषय महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना प्रलंबित ठेवावा लागला. मिरज व कुपवाडच्या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील मॉडेल रोडचे विषयपत्र मान्यतेसाठी पुढील महासभेपुढे आणण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले. महापालिकेच्या सभागृहात गुरूवारी महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त सुनील पवार, नगरसचिव चंद्रकांत आडके तसेच पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग 76 कोटी रुपये खर्चुन ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित करण्याचा विषय काँग्रेस नगरसेवकांनी उपस्थित केला.

नगरसेवक अभिजीत भोसले, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, उत्तम साखळकर, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, रोहिणी पाटील, पवित्रा केरीपाळे, आरती वळवडे यांच्यासह सांगलीच्या नगरसेवकांनी या विषयाला मंजुरीसाठी आग्रह धरला. पण केवळ सांगलीतीलच एक रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित न करता मिरज व कुपवाडमधील रस्ताही मॉडेल रोड म्हणून विकसित करावा. एकत्रित विषयपत्र आणावे, असा आग्रह सभापती निरंजन आवटी (भाजप), राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, भाजपच्या नगरसेविका संगीता खोत, राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात, डॉ. नर्गिस सय्यद, कुपवाडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने तसेच विजय घाडगे, भाजपचे प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर व मिरज, कुपवाडमधील अन्य नगरसेवकांनी धरला.

राजर्षी शाहू मार्ग विकसित करण्याचे विषयपत्र तयार झालेले आहे. त्यामुळे आजच्या महासभेत हा विषय मंजूर करू. पुढील महासभेत मिरज व कुपवाड येथील रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित करण्याचा ठराव करू. दरम्यानच्या कालावधीत प्रशासनाने मिरज व कुपवाडच्या रस्त्याचे अंदाजपत्रक व विषयपत्रक तयार करावे, अशी भूमिका महापौर सूर्यवंशी व सांगलीतील नगरसेवकांनी घेतली. सांगलीतील भाजपच्या नगरसेवकांनीही तशी भूमिका घेतली. मात्र मिरज आणि कुपवाडच्या नगरसेवकांनी जोरदार दंगा केला. एकाचवेळी तिन्ही शहरातील मॉडेल रस्त्याचे विषयपत्र महासभेपुढे आणा, अशी जोरदार मागणी मिरज व कुपवाडच्या नगरसेवकांनी केली. सांगली आणि मिरज व कुपवाड, अशी विभागणी नगरसेवकांमध्ये झाली. प्रचंड गदारोळ झाला. नगरसेवक महापौरांच्या डायससमोर येऊन घोषणाबाजी करू लागले. अखेर महापौर सूर्यवंशी यांना पक्षाकडून मोबाईलवरून निरोप आला आणि राजर्षी शाहू महाराज मार्ग विकसित करण्याचा विषय तूर्त प्रलंबित ठेवत एकाचवेळी तीनही शहरातील रस्त्यांचा विषय पुढील महासभेपुढे आणण्याचा निर्णय झाला. तसे रुलिंग महापौर सूर्यवंशी यांनी दिले.

सोळा नगरसेवकांची शिक्षण समिती

महापालिका शाळांकडे गायन, नृत्य, कराटे प्रशिक्षणासाठी दहा हजार रुपये मानधनावर 60 शिक्षक नियुक्तीसाठी अर्ज मागविण्याचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. दरम्यान सोळा नगरसेवकांची शिक्षण समिती निवड करण्याचा निर्णय झाला. समितीच्या अहवालानंतर 60 शिक्षकांच्या निवडीसंदर्भात निर्णय होईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. कुपवाड येथील हजरत पीर लाडले मशायक दर्गा तसेच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक तीर्थक्षेत्रामध्ये घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास मान्यता दिली.

हे विषय ठेवले प्रलंबित

मिरज येथील खंदक जागेमध्ये भाजी मंडई करिता पोच रस्ता व महानगरपालिकेच्या ताब्यात न आलेल्या जागेचे भूसंपादनावरून जोरदार चर्चा झाली. या विषयाची मान्यता प्रलंबित ठेवली. या जागेवरील अतिक्रमण, न्यायालयीन प्रकरण यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले. मिरजेत रेल्वे स्टेशनजवळील सध्या बंद असलेला जुना जकात नाका हा गांधी चौक पोलिस ठाणे मिरज भाडेतत्त्वार देण्याचा विषयही प्रलंबित ठेवण्यात आला. मिरज येथील मिरज बालगंधर्व नाट्यमंदीर विजापूर वेस ते जिलेबी चौक हा रस्ता 40 फूट ( 12.20 मी.) ऐवजी 30 फूट करण्यासंदर्भातील विषयही प्रलंबित ठेवण्यात आला.

Back to top button