सांगली : शासकीय यंत्रणांच्या गतिमानतेवर भर : कामगार मंत्री सुरेश खाडे | पुढारी

सांगली : शासकीय यंत्रणांच्या गतिमानतेवर भर : कामगार मंत्री सुरेश खाडे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्य आणि देशाला विकास, आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी केंद्र व राज्यशासन अनेक योजना राबवित आहेत. या माध्यमातून सामान्यांंपर्यंत विकास नेण्यासाठी शासकीय यंत्रणांनी कामाच्या गतिमानतेवर भर देण्याचे आवाहन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.

देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात खाडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. यावेळी ते बोलत होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त सुनील पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख – पाटील उपस्थित होते.

ना. खाडे म्हणाले, स स्वातंत्र्यासाठी जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. बिळाशीचा जंगल सत्याग्रह, धुळे येथे सांगलीच्या क्रांतिकारकांनी लुटलेला खजिना, वाटेगाव येथे सारावाढ विरोधात मोर्चा, तासगाव मोर्चा, इस्लामपूर मामलेदार कचेरीवरील मोर्चा, विश्रामबाग रेल्वे स्टेशन जाळण्याची घटना, कुंडल येथे बँकेवर घातलेला दरोडा, शेणोली खिंडीत रेल्वेची लुट या घटनांचे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत प्रखर महत्व आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची कामगिरी हे तर स्वातंत्र्य लढ्याचे सुवर्णपानच आहे.

खाडे म्हणाले, जिल्ह्याने आजअखेर 49 आंतरराष्ट्रीय खेळाडू जिल्ह्याने दिले आहेत. दरम्यान, यावेळी ना. खाडे यांच्या हस्ते डॉ. कैलास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक संतोश डोके, रविराज फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. विजय कडणे यांनी सुत्रसंचालन केले.

तानपुरा वाद्यास जीआय मानांकनासाठी प्रयत्न

ना. खाडे म्हणाले, मिरज येथे तयार होत असलेल्या जगप्रसिध्द तंतूवाद्यातील तानपुर्‍यास जीआय मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. लवकरच ते मिळेल, अशी खात्री आहे.

Back to top button