सांगली : पुढारी वृत्तसेवा; भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून सन 1942 च्या 'छोडो भारत' आंदोलनाची नोंद आहे. महात्मा गांधींनी राज्यकर्त्या ब्रिटिशांना 'चले जाव' असे सुनावत देशवासीयांना निर्णायकी आंदोलनाची हाक दिली होती. सारा देश या आंदोलनाने भारून गेला होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धगधगत होता. स्वातंत्र्यलढा जोमात होता. सध्याचा सांगली जिल्हा त्यावेळी दक्षिण सातारा जिल्ह्यात समाविष्ट होता. या भागातही स्वातंत्र्याचे वारे जोरात होते. अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होते. अनेकजण तुरुंगात होते. 'चलेजाव' चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल वसंतदादा पाटील, हिंदूराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलिंग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबुराव जाधव, विठ्ठल शिंदे, दत्तात्रय पाटील, नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबुराव पाचोरे यांना सांगलीच्या जेलमध्ये डांबले होते. या जेलमधून त्यांना सातार्याच्या जेलमध्ये पाठवले जाणार होते.
वसंतदादा व हिंदूराव पाटील यांनी सांगलीचा जेल फोडून भुमिगत व्हायचे ठरवले. अन्य सहकार्यांनाही याबाबतची माहिती दिली. पण जेल फोडून पसार होणे तितके सोपे नव्हते. सांगलीचा जेल हा जुन्या किल्ल्यात उभारला होता. सभोवताली भक्कम तटबंदी होती. खंदक व जागोजागी पोलिसांचा सशस्त्रIndia@75 : क्रांतिकारकांनी फोडला सांगलीचा तुरूंग! वसंतदादांनी जखमी अवस्थेतच दिली होती झुंज
पहारा होता. जेलमध्ये वसंतदादांना स्वतंत्र खोलीत ठेवले होते. त्यांच्यावर विशेष पाळत होती. पण वसंतदादा व त्यांचे सहकारीही काही कमी नव्हते. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास तयार होते. त्यामुळे भक्कम तटबंदी आणि कडक पहारा असला तरीही जेल फोडून पसार व्हायचे हे दादांसह 16 सहकार्यांनी ठरवले. यासाठी शनिवार, 24 जुलै 1943 ही तारीखही ठरली. या दिवशी दुपारी 2.30 वाजता सर्व 16 स्वातंत्र्यसैनिक एकत्र आले आणि पहारेकर्यांवर चाल करून गेले. अचानक झालेल्या या हल्ल्याने पहारेकरी पुरते भांबावून गेले. बंदुका खाली ठेवून शरण गेले.
वसंतदादा आणि इतर क्रांतिकारकांनी जेलमधील पहारेकर्यांकडील बंदुका, काडतुसे घेऊन तटबंदीकडे धाव घेतली. उंच तटावरून खंदकात उडी मारायची होती. सोळापैकी दोघांना पोहता येत नव्हते. चौदाजणांनी खंदकात उडी मारली. तुरूंग फोडून क्रांतीकारक बाहेर पडले. कृष्णा नदीकडे धाव घेतली. तुरुंग फोडणार्या क्रांतिकारकांच्या मागे ब्रिटिश घोडेस्वार पोलिसांचा पाठलाग सुरु झाला. हे क्रांतीकारक हरिपूरकडील पेवाच्या रस्त्याने, कृष्णा नदीकाठाने पळत सुटले. सतरा वर्षाचे क्रांतीवीर आण्णासाहेब पत्रावळे यांना पोलिसांची गोळी लागली. गोळीबारात ते हुतात्मा झाले. बाबुराव बाळा जाधव (बेळगाव) यांना पुराच्या पाण्यातून पोहत जात असताना पोलिसांची गोळी लागली आणि त्यात ते शहीद झाले. पोलिसांच्या गोळीने वसंतदादा यांच्या छातीचा वेध घेतला. जखमी अवस्थेतच दादा पोलिसांशी झुंजत राहिले. वसंतदादांसह काही क्रांतीकारकांना ब्रिटीश पोलिसांनी अटक केली. काही क्रांतिकारकांनी पूर आलेल्या कृष्णेच्या पाण्यातून पलिकडचा काठ गाठला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील हा एक मोठा धाडसी प्रयत्न ठरला. भक्कम तटबंदी आणि कडक पहारा असलेला तुरुंग फोडणे, पोलिसांचा गोळीबार चुकवत धावत सुटणे, प्रत्युत्तरादाखल गोळाबार, दुथडी नदीत उड्या मारून पोहत पैलतीर गाठणे हे सर्व ऐकून आजही अंगावर रोमांच उभे करतात. ब्रिटीश सत्तेला हादरा देण्याचा प्रयत्न आपल्या सांगलीतूनही अशा पद्धतीने झाला होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या शूरवीर क्रांतीकारकांचे स्मरण अतिशय महत्वाचे आणि सध्याच्या काळात गरजेचे आहे.
हे ही वाचा :