चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य निराशेतून : जयंत पाटील | पुढारी

चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य निराशेतून : जयंत पाटील

सांगली : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. राज्यात कुठेही गुंडगिरी होत नाही. पोलिस त्यांचे काम करीत आहेत. आता सरकार पाच वर्षे हलणार नसल्याची खात्री पटल्याने, पोलिस आणि प्रशासन विरोधकांचे ऐकत नाहीत, त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निराश झाले आहेत. या निराशेतून त्यांची अशी वक्तव्ये अधून-मधून होणार आहेत, असा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, महापुरावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी करण्यासाठी कोल्हापुरातून राजापूर बंधारा याठिकाणी बोगद्यातून पंचगंगा नदीचे पाणी सोडण्याच्या जाहीर केलेल्या प्रकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्षेप नोंदवला आहे; पण कोल्हापूर जिल्ह्यातील पूर प्रसंग टाळण्यासाठी जनहिताचा निर्णय आम्ही घेतला आहे, जर त्यांना तो प्रकल्प नको असेल, तर तो आपण रद्द करू. मात्र, त्यांनी हवेत आरोप करू नयेत.

पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या मदती बाबतीत योग्य निर्णय झाला आहे, त्यामुळे राजू शेट्टी यांनी कोणतीही पदयात्रा काढण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पूरग्रस्त शेतकर्‍यांना चांगली मदत करण्याचा योग्य निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोणतेही मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही.

Back to top button